'भिवंडी महापालिकेत मराठी नामफलकांची सक्ती करावी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:26 AM2020-02-29T00:26:30+5:302020-02-29T00:26:36+5:30
विरोधी पक्षनेत्यांची आयुक्तांकडे मागणी
भिवंडी : राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देऊन कारभार करावा, असे आदेश दिले असताना भिवंडी पालिकेत या आदेशांची पायमल्ली होत आहे. मनपाच्या प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या कार्यालयातील दरवाजांवरचे बहुतांश नामफलक उर्दू भाषेत आहेत. आयुक्तांनी तातडीने ते काढून त्याजागी मराठी पाट्या लावण्याची मागणी भिवंडी मनपाचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी गुरु वारी महापालिकेत झालेल्या मराठी भाषा दिन कार्यक्र मप्रसंगी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे केली.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो. त्याअनुषंगाने पालिकेच्या वतीने कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्र म पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यशवंत टावरे, डॉ. प्रवीण आष्टीकर, उपायुक्त दीपक कुरळेकर, बांधकाम अभियंता एल.पी. गायकवाड, सुभाष झळके, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भिवंडी पालिकेत सर्व भाषिक नगरसेवक आहेत. मात्र, प्रभाग समिती कार्यालयात अनेक सभापतींनी त्यांच्या नावाच्या पाट्यांत उर्दू भाषेत लावल्या आहेत. महापालिकेत घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखला तसेच अन्य कामांसाठी आॅनलाइन सेवा इंग्रजी भाषेत आहे.
भिवंडी हे कामगारांचे शहर आहे. त्यांना उर्दूचे संपूर्ण ज्ञान नसल्याने विविध अडचणी येतात. त्यामुळे आयुक्तांनी उर्दू भाषिक पाट्या काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी टावरे यांनी केली. १३ फेब्रुवारी रोजी निवेदन दिल्याचे स्मरणही त्यांनी यावेळी आयुक्तांना करून दिले.