भिवंडी महापालिका चार प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 09:40 PM2021-12-23T21:40:31+5:302021-12-23T21:45:02+5:30
प्रभाग समिती एक साठी झालेल्या निवडणुकीत आरपीआय एकतावादी विजयी
- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी महापालिकेच्या पाचही प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने गुरुवारी पालिका सभागृहात जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकी दरम्यान प्रभाग समिती दोन ते पाच अशा चार प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये झालेल्या निवडणुकीत आरपीआय एकतावादी पक्षाचे शरद धुळे यांनी काँग्रेस उमेदवार श्रीमती कशाफ अश्रफ खान यांचा ६ मातांच्या मताधिक्याने पराभव केला. धुळे यांना ११ मते तर खान यांना अवघी ५ मते मिळाली.
निवडणूक सुरू करण्यापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत प्रभाग समिती दोन मधून मतलूब अफजल खान यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रशांत लाड हे काँग्रेस उमेदवार विजयी झाले तर प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये श्रीमती अंजू अहमद सिद्दिकी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये शरद नामदेव धुळे (आरपीआय एकतावादी ) श्रीमती कशाफ अश्रफ खान ( काँग्रेस) यांच्यात सरळ लढत झाली . ज्यात धुळे विजयी झाले.
महापालिकेतील पाच प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेस चे ३, भाजपा १ तर आरपीआय एकतावादीचे १ असे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच प्रभाग समिती क्रमांक तीन मध्ये भाजपा नगरसेविका सौ.नंदिनी महेंद्र गायकवाड , प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये काँग्रेसच्या श्रीमती नाजीमा मो. हदीस अन्सारी, प्रभाग समिती क्रमांक पाच मध्ये काँग्रेसचे परवेज अहमद सिराज अ.मोमीन यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांची अधिकृत घोषणा सभागृहात पिठासन अधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी जाहीर केली . याप्रसंगी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख ,उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे ,उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते .तर विजयी सभापतींना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी महानगरपालिका सभाशास्त्र हे पुस्तक देऊन सन्मान केला.