भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद आरपीआय इंदिसे गटाकडे; सभागृह नेतेपदी विकास निकम यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 05:13 PM2021-03-17T17:13:26+5:302021-03-17T17:15:32+5:30

Bhiwandi Municipal Corporation : भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद व सभागृह नेतेपद कोणार्कने खेचून घेत सभागृहनेते पदी आरपीआय इंदिसे गटाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लावली आहे.

Bhiwandi Municipal Corporation House Leadership to RPI Indise Group; Appointment of Vikas Nikam as Leader of the House | भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद आरपीआय इंदिसे गटाकडे; सभागृह नेतेपदी विकास निकम यांची नियुक्ती

भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद आरपीआय इंदिसे गटाकडे; सभागृह नेतेपदी विकास निकम यांची नियुक्ती

googlenewsNext

- नितिन पंडीत

भिवंडी  - भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी आरपीआय इंदिसे गटाचे नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लागली आहे. महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी मंगळवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय ऑनलाइन महासभेत निकम यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती केली आहे. गुरुवारी ते आपल्या सभागृह नेते पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौर पद व त्यानंतर आता अवघ्या चार नगरसेवक असलेले आरपीआय इंदिसे गटाकडे सभागृहनेतेपद सोपविल्याने महापालिकेतील प्रस्थापित भाजप , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत सुरुवातीला काँग्रेसचे ४६ नगरसेवक निवडून आले होते मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याने शहरात काँग्रेसची वाताहात झाली आहे. तर भाजपकडे २० नगरसेवक असतानाही त्यांनी अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद व सभागृह नेतेपद कोणार्कने खेचून घेत सभागृहनेते पदी आरपीआय इंदिसे गटाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लावली आहे. 

नुकताच झालेल्या महासभेत भाजपचे शाम अग्रवाल यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी काढून घेतले होते. सभागृह नेतेपद हिसकावून घेतल्याने भाजप गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद देखील महापौरांनी काढून घेत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या मतलुब सरदार खान यांच्याकडे सोपविले होते. मात्र त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप आल्याने आयुक्तांनी मनपातील विरोधी पक्षनेत्यांचे दालन सील केले आहे. विशेष म्हणजे चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद तर चार नगरसेवक असलेल्या आरपीआय इंदिसे गटाकडे सभागृह नेतेपद सोपविल्याने आरपीआय इंदिसे गटात आनंद उत्साह व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे तर भाजप , शिवसेना व काँग्रेस मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान महापौरांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता शहर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभागृह नेते विकास निकम यांनी दिली आहे.

Web Title: Bhiwandi Municipal Corporation House Leadership to RPI Indise Group; Appointment of Vikas Nikam as Leader of the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.