भिवंडी महानगरपालिकेने छत्रपतींच्या पुतळ्यास सजावट न केल्याने शहरातील शिवप्रेमींकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 06:43 PM2018-02-19T18:43:22+5:302018-02-19T18:50:01+5:30
भिवंडी : शहरातील कोंबडपाडा मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जावेद दळवी व पालिकेच्या अधिकाºयांनी हार घालून शासकीय शिवजयंती साजरी केली.मात्र यावेळी पालिकेचे बहुसंख्य पालिकेचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित नव्हते. या प्रसंगी पालिकेमार्फत छत्रपतींच्या पुतळ्यास सजावट न केल्याने शिवप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करीत पालिकेच्या कार्यपध्दतीचा तिव्र शब्दात निषेध केला.
शासनाच्या परिपत्रकानुसार या वर्षी देखील पालिकेच्या वतीने पालिकेच्या सभागृहात महापौर जावेद दळवी यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत शिवजयंती साजरी केली.त्यानंतर कोंबडपाडा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर जावेद दळवी,उपमहापौर मनोज काटेकर, पालिका उपायुक्त विनोद शिंगटे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शेट्टी तर सकल मराठा समाजाच्या वतीने सुभाष माने यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी शहरातील एकमेव शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालिकेने रंगरंगोटी व सजावट न केल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेचा निषेध केला.तर सकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे सुभाष माने यांनी पालिकेस छत्रपतीच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्यास सजावट करण्यासाठी पैसे नसतील तर पालिकेने छत्रपतींचा पुतळा सकल मराठा समाजाकडे सोपविल्यास आम्ही पुतळ्याची सेवा करण्यासाठी तयार आहोत,असे सांगून निषेध केला.अजयनगर येथील मराठा भवन येथुन निघालेल्या कार्यकर्त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना साईनाथ पवार,जयवंत सुर्यराव,अनिल फडतरे,अरूण राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित नसल्याने शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी तिव्र शब्दात निषेध केला. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला नाही.तर काही कार्यालये आज उघडलीच नाही.अशा कार्यालयीन अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
शिवजयंती निमीत्ताने छत्रपतींच्या पुतळ्यास पालिके मार्फत सजावट न केल्याबाबत मनपा उपायुक्त विनोद शिंगटे यांना विचारले असता त्यांनी पुतळ्यास सजावट करण्याचे आदेश कर्मचाºयांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.