भिवंडी मनपा तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे; स्थायी समिती सभापती पदी संजय म्हात्रे बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:06 PM2021-04-07T20:06:11+5:302021-04-07T20:08:32+5:30
Bhiwandi Municipal Corporation ShivSena Sanjay Mhatre : भिवंडी पालिकेत कोणार्क विकास आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी यांची सत्ता असताना आर्थिक सत्तेच्या चाव्या विरोधक काँग्रेस शिवसेना या पक्षांकडे पुन्हा एकदा गेल्या आहेत.
भिवंडी - भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे संजय म्हात्रे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य सभागृहात स्थायी समिती सभापती निवडकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समिती सभापती म्हणून संजय म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी म्हात्रे यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर केली. भिवंडी पालिकेत कोणार्क विकास आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी यांची सत्ता असताना आर्थिक सत्तेच्या चाव्या विरोधक काँग्रेस शिवसेना या पक्षांकडे पुन्हा एकदा गेल्या आहेत.
या निवडणूक प्रसंगी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त दीपक झिंजाड, सर्व स्थायी समिती सदस्य यांच्यासह प्रभारी नगरसचिव नितीन पाटील जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते. सभापती निवड झाल्यावर पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. नवनिर्वाचित सभापती म्हात्रे यांनी मावळते सभापती हलीम अन्सारी यांचेकडून स्थायी समिती पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या सह उपस्थित नगरसेवकांनी म्हात्रे यांचे अभिनंदन केले.
सप्टेंबर २०२० मध्ये स्थायी समिती सभापती मुदत संपल्यानंतर तब्बल सहा महिने ही निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या सभा होत नसल्याने अर्थसंकल्प ही आयुक्तांनी थेट महासभेला सादर केला होता. तर नगरसेवक अरुण राऊत यांनी स्थायी समिती सभापती निवडणूक घेत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती.
भिवंडी मनपाच्या स्थायी समीती मध्ये एकुण १६ सदस्य असून त्यात काँग्रेस - ८ ,शिवसेना - २ , भाजप - ४ , कोणार्क विकास आघाडी - २ असे पक्षीय बलाबल असून काँग्रेस शिवसेना सार्वत्रिक निवडणुकी पासून एकत्रित असल्याने त्यांचे वर्चस्व स्थायी समिती वर सुरवाती पासून राहिले आहे . शिवसेने चे संजय म्हात्रे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले त्या दोन्ही अर्जावर काँग्रेस नगरसेवक तसेच बंडखोर काँग्रेस व आताच्या राष्ट्रवादी गटातील नगरसेवकांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
दरम्यान ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत अवघ्या चार नगरसेवकांकडे महापौर पद, त्यानंतर चार सदस्य असलेल्या दुसऱ्या गटाकडे सभागृह नेते पद तर विरोधी पक्षनेत्यांचे दालन सील अशी सगळी राजकीय खिचडी असताना आता स्थायी समितीत अवघे दोन सदस्य असलेल्या शिवसेनेकडे स्थायी समितीचे सभापती पद गेल्याने शहरातील नागरिक मनपामधील या विचित्र राजकारणाने अक्षरशः चक्रावून गेले आहेत.