भिवंडी महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ ताकदीने उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:23+5:302021-09-05T04:45:23+5:30
भिवंडी : वंचित बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी वंचितच्या वतीने युवा जोडो अभियान कार्यक्रम राबविण्यात ...
भिवंडी : वंचित बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी वंचितच्या वतीने युवा जोडो अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे वंचितचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यात येत आहे. आगामी भिवंडी मनपा निवडणुकीत वंचित मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने अशोकनगर येथे युवा संवाद कार्यक्रम पार पडला. त्यावेळी विश्वकर्मा यांनी संवाद साधला. वंचितचे राज्य महासचिव राजेंद्र पातुडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत, वंचितचे ठाणे-भिवंडी व परिसरातील कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. मुंबई-ठाणे या शहरांपासून जवळ असलेल्या भिवंडी शहराची दयनीय अवस्था झाली आहे. चारच नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौरपद असल्याने विश्वकर्मा यांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारच्या राजकारणात फक्त आर्थिक गणित पहिले जाते. त्यात शहर विकासाकडे दुर्लक्ष होते. सध्या अशीच स्थिती भिवंडी शहराची झाली आहे. आगामी भिवंडी मनपा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, वंचितचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न असणार आहे, असे ते म्हणाले.