भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना मिळाले गणवेश शिलाईचे पैसे; मनसेच्या पाठपुराव्याला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:49 PM2021-07-29T16:49:00+5:302021-07-29T16:49:33+5:30
भिवंडी महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून गणवेशाच्या शिलाईचे रक्कम प्रलंबित असल्याने कामगार गणवेशाशिवाय पालिकेत काम करीत होते.
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून गणवेशाच्या शिलाईचे रक्कम प्रलंबित असल्याने कामगार गणवेशाशिवाय पालिकेत काम करीत होते. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी कामगार सेनेचे शहराध्यक्ष संतोष साळवी हे मागील दोन महिन्यापासुन सातत्याने आयुक्त,उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व सफाई विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कामगारांना गणवेश शिलाईची रक्कम मिळण्यासाठी सतत पाठपुरावा करीत होते. अखेर मनसेच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेत मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यांनी या प्रलंबित रक्कमेस मंगळवारी मंजूरी दिली आहे.या निर्णयाचे मनसे कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व कामगारांनी स्वागत केले आहे.
भिवंडी महापालिकेमार्फत २०५६ पुरुष व महिला कामगारांना गणवेशासाठी मनपा प्रशासनाने कपडा दिला होता. तर महिला कामगारांना साड्या दिल्या होत्या. मात्र त्यासाठी कपड्यांची शिलाई मात्र दिली नव्हती. त्या मुळे कपडे मिळून देखील कामगारांना त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी कामगार सेनेचे संतोष साळवी यांनी मनपा आयुक्तांसह प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा केला होता. अखेर मनपा आयुक्तांनी कामगारांना कपड्यांच्या शिलाईसाठी १७ लाख ४५ हजार रुपयांची मंजुरी दिली आहे. पुरुष कामगारांना एक हजार रुपये व महिला कामगार यांना ४६० रुपये प्रमाणे हा निधी मिळणार असून ते त्यांच्या खात्यावर वर्ग देखील करण्यात आले आहेत.
प्रलंबित आर्थिक निधी मिळाल्याने मनपा कामगारानी मनसे युनियनचे आभार मानत पुढील कामास शुभेच्छा दिल्या आहेत. भिवंडी मनपा युनियन अध्यक्ष संतोष साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचा पाठपुरावा करणारे मनसे युनियनचे उपाध्यक्ष श्याम गायकवाड, सहचिटणीस रविंद्र गायकवाड व मनोहर जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त सुधाकर देशमुख यांचे युनियनच्या वतीने आभार मानले आहे.