भिवंडी महानगरपालिचा करवाढ नसलेला ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रकमेचा अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 07:01 PM2022-02-22T19:01:29+5:302022-02-22T19:01:37+5:30
भुयारी गटर योजनेची कामे पूर्ण करण्याबरोबरच स्व मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्ती कामास देखील गती येणार आहे.
-नितिन पंडीत
भिवंडी- आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेत महापालिका प्रशासनाने कोणतीही करवाढ नसलेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता १२ लाख ४२ हजार शिल्लक दर्शवणारे ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रकमेचे मूळ अंदाजपत्रक मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी सादर केला. विशेष म्हणजे मागील वर्षीचा म्हणजे सन २०२१ - २२ चा ८२० कोटी ३२ लाख ८७ हजार रुपयाचे सुधारित अंदाजपत्रक देखील मनपा आयुक्तांनी यावेळी सादर केले. मागील वर्षाच्या तुलनेत फक्त सुमारे २ कोटी रुपये अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हा अर्थसंकल्प अधिक वस्तुनिष्ठ असल्याचा दावा मनपा आयुक्तांनी केला आहे.
अर्थसंकल्पात शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा होणार असून , मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्याच बरोबर रस्ते दुरुस्ती , मनपाचे बाई गुलाबबाई पेटिट रुग्णालय सुरु करणे , केंद्राच्या निधीतून चार नागरी आरोग्य केंद्र पूर्ण करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले असून शहरातील वऱहाळदेवी तलाव येथील जुन्या शहरासाठी जो दोन एमएलडी पाणी पुरवठा होत होता त्या ऐवजी आता पाच एमएलडी होणार आहे त्याच बरोबर शहरातील नागरिकांना १३५ लिटर प्रति कुटुंब पाणीपुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे. भुयारी गटर योजनेची कामे पूर्ण करण्याबरोबरच स्व मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्ती कामास देखील गती येणार आहे.
मालमता कर वसुलीसाठी जिआयएस प्रणाली मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन तसेच अग्निशामक दल यंत्रणा सुधारणा , नादुरुस्त पालिका शाळा इमारती दुरुस्ती , शहरातील वृक्ष गणना करून पर्यावरण संवर्धन , वऱ्हाळ तलाव व भादवड तलाव सुशोभीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार असून शहरांतर्गत रस्ते वाहतूक सुविधा त्रासदायक असल्याने परिवहन सेवा सुरु करण्या बाबत कोणताही विचार प्रशासनाचा नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. एकंदरीत गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांनी सादर केला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.