भिवंडी महानगरपालिकेचं स्वच्छ भारत अभियान कागदावरच; मुख्य आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:30 PM2021-05-27T17:30:33+5:302021-05-27T17:35:50+5:30
Bhiwandi Municipal Corporation : मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.
नितिन पंडीत
भिवंडी - शहर स्वच्छतेबाबत नेहमीच उदासीन असलेल्या भिवंडी महापालिकेची स्वच्छ भारत मोहीम फक्त कागदावरच राबविली जात असल्याचा आरोप मनपाच्या स्थायी समितीचे सदस्य तथा काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक अरुण राऊत यांनी केला असून यास जबाबदार असणाऱ्या मनपाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राऊत यांनी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नगरसेवकांच्या या मागणी व आरोपामुळे शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा चव्हाट्यावर आला आला आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून हेमंत गुळवी कार्यभार सांभाळत आहेत मात्र त्यांच्या कामात हलगर्जीपणा असल्याल्यामुळेच शहारत स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नगरसेवक अरुण राऊत यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. जून महिना जवळ आला तरी शहरातील नाले सफाईचे काम आजपर्यंत पूर्ण झाले नाही या कामाकडे मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी गुळवी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला असून पावसाळ्यात नालेसफाई अभावी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल देखील त्यांना आयुक्तांना विचारला आहे.
२५ डिसेंबर २०२० रोजी महापालिकेकडून एसटी स्टँड ते गायत्रीनगर भागात स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आली होती यावेळी मनपा अधिकाऱ्यांसह आपण स्वतः या ठिकाणी हजर होतो त्यावेळी स्वछता मोहीम फक्त नावापुरता करण्यात आली असून आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मोहीम न राबविता फक्त फोटो काढण्यात आले व फक्त कागदावरच स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आला असून मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे वेळोवेळी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेची खिल्ली मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून केली जात असून ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गीकरण करून तसेच कॉम्पॅक्ट मशिन बंदीस्त कचरा वाहतूक करणे महापालिकांना अनिवार्य असल्याचे निर्देश खुद्द सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतांनाही शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची देखील पायमल्ली होत असून त्यास मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी जबाबदार असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचा देखील अवमान होत आहे.
आपण वेळोवेळी त्याची तक्रार देखील मनपा प्रशासनाकडे केली आहे मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राऊत यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेजाबदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मनपा प्रशासन विनाकारण बदनाम होत असून त्यास मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी हेच जबाबदार असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी व त्यांची बदली इतरत्र करावी अशी लेखी मागणी काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे. आता मनपा आयुक्त या विषयाची नेमकी कशी दाखल घेतील याकडे नगरसेवक राऊत यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान यासंदर्भात मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. तर मनपाच्या आरोग्य विभागात अतिशय गलथान कारभार सुरू असून मनपा आयुक्तांचे आरोग्य अधिकाऱ्यांवर कोणतेही वाचक नसल्याने शहरात कचरा तसेच नालेसफाईची समस्यां मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने त्यास मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी हेच जबाबदार असून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली इतरत्र करण्याची मागणी मी येत्या महासभेत उचलून धरणार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली आहे.