भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:33 AM2019-12-14T01:33:59+5:302019-12-14T01:34:29+5:30
भिवंडी : शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची शुक्रवारी नियोजित असलेली निवडणूक कोकण आयुक्तांच्या आदेशांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी ...
भिवंडी : शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची शुक्रवारी नियोजित असलेली निवडणूक कोकण आयुक्तांच्या आदेशांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा रद्द केली. त्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, विविध विषय समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक सुरळीत पार पडली.
स्व. विलासराव देशमुख सभागृहात हात उंचावून झालेल्या या निडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. नार्वेकर यांनी काम पाहिले. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, ठाणे महाजिल्हा पालिका प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे उपस्थित होते.
बांधकाम समिती सभापती नाजेमा मो. हदीस अन्सारी आणि उपसभापती म्हणून जुबेर अहमद मो. फारूक, आरोग्य आणि स्वच्छता समिती सभापती मुख्तार अहमद मोहमद आली खान तर उपसभापती म्हणून साजिद हुसेन तफज्जूल हुसेन अन्सारी, शिक्षण समिती सभापतीपदी वैशाली मनोज म्हात्रे, तर उपसभापती म्हणून फरजाना मो. इस्माईल रंगरेज, क्रीडा समिती सभापतीपदी परवेज अह. सिराज अह. मोमीन तर उपसभापती म्हणून नाजेमा मो. हदीस अन्सारी, गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापतीपदी मनीषा दांडेकर तर उपसभापती फिरोजा अबुसुफियान शेख, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नादिया इर्शाद खान तर उपसभापतीपदी सुग्राबी हाजीशाहा खान यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी सर्व सभापती-उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊ न अभिनंदन करण्यात आले.
तक्रार निवेदनामुळे स्थगिती
दरम्यान, स्थायी समिती सभापती निवडणुकीवर माजी खासदार सुरेश टावरे आणि माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे तक्रारी निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना भिवंडी महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी नव्याने प्रक्रि या सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक स्थगित करून उर्वरित विषय समितींच्या निवडणुका शुक्र वारी पार पडल्या.