'भिवंडी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:38 PM2019-11-18T22:38:50+5:302019-11-18T22:38:58+5:30
नागरी सुविधा देण्यात अपयश; राज्यपालांकडे नागरिकांची मागणी
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरू आहे. शहरवासीयांना अनियमित पाणीपुरवठा, बेसुमार बेकायदा बांधकामे आणि खराब रस्ते अशा विविध कारणांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि प्रशासन तसेच महापौर, उपमहापौर आणि लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करूनही लक्ष दिले जात नाही. शहरात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. नगरविकास विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे शहराचा विकास खुंटला असून राज्यपालांनी भिवंडी पालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्य शासनाने भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. मात्र, या निधीतून अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी स्वत:चे उखळ पांढरे करत आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरु स्तीसाठी थातूरमातूर डांबरी पॅचवर्ककेले जात आहे. त्यामुळे १५ दिवसांतच रस्ते पुन्हा उखडत आहेत. खराब रस्त्यांमुळे अपघात व वाहतूककोंडी होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेला सुमारे ५० कोटींचा निधी आला होता. मात्र, अडीच वर्षांत शहरातील स्वच्छता पाहता हा निधी नेमका कुठे मुरला, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरात क्षयरोग, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडेही तक्रारी करण्यात आल्या; मात्र प्रत्येक वेळी उच्चस्तरावरून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या या भ्रष्ट कारभाराविषयी राज्यपालांनी उच्चस्तरीय आणि गुन्हे शाखेतर्फे चौकशी करून महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक खालिद गुड्डू तसेच जागरूक नागरिक फारूक इक्बाल चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भिवंडी महापालिका सर्वाधिक भ्रष्ट आणि स्वच्छता आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे ही महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
- खालिद गुड्डू, एमआयएम