भिवंडी पालिका: बायोमेट्रिक ‘हजेरी’ न लागल्याने वेतनकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:51 AM2017-11-15T01:51:33+5:302017-11-15T01:57:55+5:30
बायोमेट्रीक यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडामुळे व बदल्या झालेल्या कामगारांनी हजेरीकरिता बोटांचे ठसे न दिल्याने भिवंडी महापालिकेच्या कामगार, कर्मचा-यांच्या आॅक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
भिवंडी : बायोमेट्रीक यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडामुळे व बदल्या झालेल्या कामगारांनी हजेरीकरिता बोटांचे ठसे न दिल्याने भिवंडी महापालिकेच्या कामगार, कर्मचा-यांच्या आॅक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अगोदरच सफाई कामगारांनी वेगवेगळ्या प्रभागात साफसफाई केली किंवा कसे, याबाबत नगरसेवकाकडून दाखला आणल्यावरच वेतन देण्याबाबतचा फतवा आयुक्तांनी काढल्याने असंतोष निर्माण झालेला असताना आता बायोमेट्रीकमुळे आणखी भडका उडाला आहे.
पालिकेत पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी काम करत असून शहर स्वच्छता विभागात सुमारे २२०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कार्यालयीन कर्मचाºयांनी बायोमेट्रीक पद्धतीने आपली हजेरी नोंदवली असेल, तरच पगार देण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना व लेखा विभागास दिले आहेत. कर्मचाºयांच्या बदल्या झाल्याने काहींनी आपली हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने लावलेली नाही. आस्थापना विभागाच्या दाव्यानुसार, जवळपास ५० टक्के कर्मचाºयांनी या ना त्या कारणास्तव बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी न लावल्याने कर्मचाºयांच्या आॅक्टोबरच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
बायोमेट्रीक पद्धतीने पगार करण्यासाठी आस्थापना विभागाने संगणक विभागाकडून कर्मचाºयांच्या उपस्थितीचा अहवाल मागवला आहे. मात्र, अद्याप आस्थापना विभागास अहवाल प्राप्त झालेला नाही. पालिकेचा संगणक विभाग निष्क्रिय असल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला असून सदोष बायोमेट्रीक मशीनमधील आमची गैरहजेरी लागल्याचा त्यांचा दावा आहे. काही कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
संगणक विभागप्रमुख प्रशांत बायस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. पालिकेत कामगार कल्याण अधिकारी नसल्याने कामगारांवर अन्याय होत असल्याचा दावा कामगार संघटनाच्या पदाधिकाºयांनी केला. आयुक्तांच्या या निर्णयाने पालिकेच्या सफाई कामगारांमध्ये संतापाचे वातवरण पसरले आहे. त्यातच बायोमेट्रिक हजेरीने त्यांच्या संतापात अधिकच भर पडली आहे.
आयुक्तांकडे तक्रारी-
सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक व अधिकारी प्रभागात जाऊन सफाई करत नाहीत, जंतुनाशकांची फवारणी करत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने आयुक्तांनी सफाई कर्मचाºयांना प्रभागात सफाई केल्याचे शिफारसपत्र नगरसेवकांकडून आणण्यास सांगितले.