Bhiwandi: भिवंडीत निकृष्ट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाविरोधात एमआयएम पक्षाचे एकदिवसीय उपोषण
By नितीन पंडित | Published: May 23, 2023 07:06 PM2023-05-23T19:06:17+5:302023-05-23T19:07:41+5:30
Bhiwandi: रस्त्याचे त्रयस्थ संस्थे मार्फत ऑडिट करावे व ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी एम आय एम भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालया समोर मंगळवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
- नितीन पंडित
भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रात एम एम आर डी ए प्राधिकरण कडून कोट्यवधी रुपये खर्च करून बनविण्यात येत असलेल्या अनेक काँक्रिट रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्या बाबत ओरड होत असताना आमदार रईस शेख यांच्या विकास निधीतून बनविण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्यास उद्घाटना आधीच तडे गेल्याने या रस्त्याचे त्रयस्थ संस्थे मार्फत ऑडिट करावे व ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी एम आय एम भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालया समोर मंगळवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.
शांतीनगर भागातील खान कंपाउन्ड,अलफलक शाळेजवळ भिवंडी पुर्व विधानसभा आमदार रईस शेख यांच्या स्थानिक विकास निधीतून १७ लाख खर्च करून आर.सी.सी. रोड व गटारीचे काम करण्यात आले आहे .दरम्यान ११ जानेवारी रोजी आमदार रईस शेख यांनी सदर रस्त्याचे लोकार्पण करून वापरात आला असल्याचे समाज माध्यमांवर जाहीर केले होते.या रस्त्याचे काँक्रिट काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यास तडे गेले असल्याची तक्रार एम आय एम शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांनी पालिका प्रशासनाकडे १४ फेब्रुवारी केली होती.त्यामध्ये रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थे मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली.परंतु पालिका प्रशासनाने या मागणी कडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून ही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उस्मानी यांनी या आंदोलनावेळी केला.
आमदार रईस शेख व पालिका अधिकारी संगनमताने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास पाठीशी घालून भ्रष्टाचारास वाव देत असल्याचा आरोप देखील शादाब उस्मानी यांनी केला असून आम्ही तक्रार केल्या नंतर पालिका प्रशासनाच्या वतीने शहर अभियंता सुनील घुगे यांनी लोकार्पणा आधीच्या दिनांकाची नोटीस ठेकेदारास बजावून निकृष्ट काम पुन्हा दुरुस्त करण्या बाबत सुचविले .या वरून हे स्पष्ट होते की पालिका प्रशासनाचे ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे लक्ष नव्हते हे स्पष्ट होत असल्याचा आरोप उस्मानी यांनी केला आहे.