भिवंडीत खासगी ठेकेदार करणार घरपट्टी पाणीपट्टी वसुली; महासभेत ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 09:34 PM2020-12-16T21:34:22+5:302020-12-16T21:34:33+5:30
अधिकृत माहिती मनपा प्रशासनाकडून अजूनही मिळाली नाही.
- नितिन पंडीत
भिवंडी: हलगर्जी कारभाराबाबत राज्याभर चर्चेत असणारी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला दिल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भिवंडी महानगर पालिकेची तहकूब महासभा बुधवारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडली . विशेष म्हणजे सभागृहात हजर राहण्याची मुभा देखील या महासभेत होती. या महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्याचा ठराव पास करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मनपा प्रशासनाकडून अजूनही मिळाली नाही. मात्र तसा ठराव पास करण्यात आला असल्याचे खात्री लायक वृत्त मनपाच्या एका अधिकाऱ्याने दिले आहे. महत्वाचे म्हणजे महासभेच्या पटलावर घरपट्टी व पाणीपट्टीचा खासगी ठेका देण्या संदर्भाचा विषय देखील नव्हता.
आयत्या वेळेत या विषय महासभेत शेवटी ठेवण्यात आला होता व त्याला मान्यता मिळाली अशी माहिती मनपाचे नगरसेवक निलेश चौधरी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आज महासभेसाठी सभागृहात आपण स्वतः हजर होतो. विषय पत्रिकेतील विषय आटोपते आल्या नंतर आपण घरी आलो माझ्या सोबत अनेक नगर सेवक देखील सभागृहा बाहेर पडले होते. मात्र मी घरी आल्या नंतर यासंदर्भात मला माहिती मिळाली की घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका देण्यासंदर्भात महासभेत विषय चर्चेला आला व त्यास मान्यता मिळाली.
आपण नगरसेवक असून देखील आपणाला यासंदर्भात काहीही माहिती नसून शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेला विषय तहकूब महासभेत अशा प्रकारे घेणे बेकायदेशीर असून त्यास आपण लेखी विरोध करणार असून हा बेकायदेशीर ठराव नामंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत अशी माहिती नगरसेवक निलेश चौधरी यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे महासभेच्या विषय पत्रिकेत विषय नसतांना देखील तहकूब महासभेत हा ठराव पास झालाच कसा अशी चर्चा शहरात असून हा ठराव पास झाल्यास राज्यात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा खासगी ठेका देणारी भिवंडी महापालिका हि राज्यातील बहुतेक पहिली महानगर पालिका ठरणार असून आता या ठारावामुळे शहरातील राजकीय निश्चितच ढवळून निघणार आहे.