भिवंडीचे पथक ठरले ‘तालसंग्राम’मध्ये अव्वल; डोंबिवलीकर ढोलताशाप्रेमींची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:57 AM2020-02-04T00:57:03+5:302020-02-04T00:57:31+5:30
फलटणच्या शिवरुद्र, गोव्याच्या जगदंब पथकांनीही मारली बाजी
डोंबिवली : आरंभ प्रतिष्ठानच्या विद्यमाने तालसंग्राम-२०२० या तिसऱ्या वर्षीच्या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला शनिवारी सावळाराम क्रीडासंकुलाच्या पटांगणात सुरुवात झाली. रविवारी या दोनदिवसीय स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न झाली. यासाठी एकूण १३ ढोलताशा पथकांपैकी सहा पथकांची निवड झाली. त्यातून तीन जणांची निवड करण्यात आली. भिवंडीचे शिवस्वरूप ढोलताशा पथक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी या पथकाला दीड लाख रुपयांचा धनादेश, आकर्षक ट्रॉफी आणि सांस्कृतिक संचालनालय विभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
या स्पर्धेत फलटणच्या शिवरुद्र ढोलताशा पथकाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार प्रमोद पाटील यांनी या पथकाला एक लाख रुपयांचा धनादेश, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले. गोव्याच्या जगदंब ढोलताशा पथकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. भिवंडीच्या विजयी पथकातील वादक यावेळी भावुक झाले होते. त्यांना आमदार पाटील, आमदार चव्हाण यांनी जवळ घेऊन विजयाचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी हजारो ढोलताशाप्रेमींनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत कौतुकाची थाप दिली.
उत्कृष्ट ढोलवादक म्हणून ओम माने- शिवरुद्र ढोलताशा पथक, उत्कृष्ट ताशावादक हिमांशू कुलकर्णी- तालरुद्र ढोलताशा पथक, उत्कृष्ट टोलवादक मानस वाणी- शिवस्वरूप ढोलताशा पथक आदींना १० हजार रुपयांचे पारितोषिक, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांचेही पथक यात सहभागी झाले होते. आरंभ प्रतिष्ठानच्या आयोजकांनी महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून विशेष पारितोषिक अंमळनेरच्या नादब्रह्म पथकाला जाहीर करण्यात आले. या पथकाला मनसेच्या महिला अध्यक्षा मंदा पाटील यांनी सन्मानित केले.
यंदा या स्पर्धेसाठी गोवा, अंमळनेर, फलटण, नाशिकसह ठाणे, मुंबई, कोकण भागांतून १३ पथकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये नाशिकचे तालरुद्र, बेळगावचे धाडस, अंमळनेरचे नादब्रह्म, फलटणचे शिवरुद्र, तसेच मावळे आम्ही ढोलताशांचे, छावा, शिवस्वरूप, मावळे, आम्ही कांदिवलीकर, पार्लेस्वर, बदलापूरचे शिवसूत्र, जगदंब, नादब्रह्म आदी पथकांचा समावेश होता.
या स्पर्धेला राज्य शासनाचा विशेष निधी मिळाला असून, चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीत हा दर्जा मिळवून दिला होता. त्याबद्दल आरंभ प्रतिष्ठानच्या आयोजकांनी त्यांचे आभार मानले. या क्षेत्रातील तज्ज्ञ पुण्याचे रहिवासी सुजित सोमण, गणेश गुंड-पाटील, निलेश कांबळे आदी या स्पर्धेचे परीक्षक होते. यावेळी सैनिकी स्कूलच्या कॅडेट्सना राष्ट्रासाठी काही क्षण या संकल्पनेंतर्गत सहभागी करण्यात आले होते. त्यांची मानवंदना, परेड हे क्षण पाहण्यासारखे होते.
या स्पर्धेनिमित्त बनवण्यात आलेली ३०० फुटांची लोखंडी गॅलरी यापुढे सगळ्या खेळांसाठी खुली असून ती विनामूल्य उपलब्ध असेल. ज्या संस्थांना तिचा लाभ हवा आहे, अशांनी डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार, भाजप कार्यालय तसेच आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. डोंबिवलीकरांच्या मनोरंजनाची उणीव या स्पर्धेने भरून निघाल्याचे आमदार पाटील म्हणाले.
अशा स्पर्धांसाठी हवे ते सहकार्य करण्याचा शब्द नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वंडार पाटील यांनी रविवारी या स्पर्धेचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यास मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, खुशबू चौधरी, राजन मराठे, शिवाजी आव्हाड, डॉ. मिलिंद शिरोडकर, मेहुल जेठवा, कल्पेश पटेल, हेमंत पटेल, सचिन पटेल आदींसह मान्यवर उपस्थित होते.