भिवंडीत अनधिकृत टपऱ्या, दुकानांवर वनविभागाने फिरवला जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:29+5:302021-09-26T04:43:29+5:30
भिवंडी : महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे टायर पंक्चर दुरुस्ती व भंगार विक्रेत्यांनी बस्तान बसविले असून, याबाबत नेहमी ...
भिवंडी : महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे टायर पंक्चर दुरुस्ती व भंगार विक्रेत्यांनी बस्तान बसविले असून, याबाबत नेहमी ओरड होते. मुंबई - नाशिक महामार्गावर लोनाड हद्दीतील सर्व्हे क्रमांक १९४ मध्ये अनेक पत्र्यांचे शेड बांधून भूमाफियांनी कब्जा करीत ती दुकाने भाड्याने दिली होती. अखेर याबाबत वन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. शनिवारी या अनधिकृत अशा आठ पत्राशेड व दुकानांवर कारवाई करून जेसीबी फिरवला आहे.
या कारवाईमुळे वन जमिनीवर अनधिकृत कब्जा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. वन विभागाने ही कारवाई करताना कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय केली हे विशेष. यापुढेही वन विभागातर्फे महामार्गावरील वनविभागाच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल एस. बी. देवरे यांनी स्पष्ट केले आहे. वनपरिक्षेत्र पडघा अंतर्गत वडपा वनपाल हद्दीत वनक्षेत्रपाल पडघा एस. बी. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विलास निकम यांच्या नेतृत्वाखाली वनपाल साहेबराव खरे, दिनेश माळी, चतुरे दिघाशी, वनरक्षक जमीर इनामदार, विलास सकपाळ, भाऊसाहेब अंबुलगेकर, शरद माढा, अजय राठोड, महिला वनरक्षक बेलदार, वाहनचालक विकास उमटोल या पथकाने ही कारवाई केली आहे.