भिवंडीत अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:10+5:302021-06-20T04:27:10+5:30
भिवंडी : भिवंडी पालिका क्षेत्रातील नदी नाका वंजारपट्टीदरम्यान हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊन येणाऱ्या टँकरचा व्हॉल्व्ह तुटल्याने मोठ्या प्रमाणावर ॲसिड गळती ...
भिवंडी : भिवंडी पालिका क्षेत्रातील नदी नाका वंजारपट्टीदरम्यान हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊन येणाऱ्या टँकरचा व्हॉल्व्ह तुटल्याने मोठ्या प्रमाणावर ॲसिड गळती सुरू झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गळती थांबविल्याने मोठी दुर्घटना शनिवारी टळली.
गुजरात येथून सदरचा टँकर हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊन भिवंडीकडे येत असताना नदी नाका या ठिकाणी टँकर मागे घेत असताना अचानक या टँकरचा व्हॉल्व्ह तुटला. त्यामुळे टँकरमधील ॲसिड रस्त्यावर पसरू लागले होते. टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील केमिकल असल्याने याची माहिती अग्निशमन दलास मिळताच अग्निशमन दलप्रमुख राजेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्हॉल्व्हची तात्पुरती दुरुस्ती करून टँकर मानवी वस्तीतून हलवून पोगाव येथील मोकळ्या मैदानात आणून उभा केला. त्या ठिकाणी कंपनीचे पथक बोलावून या टँकरच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
..........