भिवंडी ग्रामीण साठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारणार
By नितीन पंडित | Published: October 31, 2022 06:35 PM2022-10-31T18:35:23+5:302022-10-31T18:35:33+5:30
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते.
भिवंडी, दि.३१-
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते. त्यामुळे ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी जोर धरत असतांना आता ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अग्निशामक दल उभारले जाणार असून त्यासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुध्दा लवकरच राबविली जाणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .केंद्रीय मंत्री पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला असून नियोजित केंद्रासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कपिल पाटील यांना दिली आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ३५ वर्षांपासून गोदामे वसली आहेत. जगभरातील नामांकित कंपन्यांबरोबरच हजारो कंपन्यांची गोदामे या ग्रामीण भागात आहेत. या गोदामांमध्ये मुंबई-ठाणे जिल्ह्यासाठी लागणाऱ्या मालाचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. मात्र, अनेक वेळा अचानक लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये गोदामे जळून भस्मसात होत आले आहेत.या गोदामांसाठी अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे भिवंडी,ठाणे,कल्याण,उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत होते.मात्र काही वेळा त्यांना वाहतूक कोंडी मुळे घटनास्थळी पोहचण्यास विलंब होत असल्यामुळे गोदामांचे मोठे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी एमएमआरडीएकडे भिवंडी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली होती.त्यानंतर एमएमआरडीएने २०२० मध्ये अग्निशमन केंद्राला मान्यता दिली होती.परंतु कोरोनामुळे केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव लांबला होता.आता कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर एमएमआरडीएने मुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिक्षक संवर्गासह इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे.या केंद्रामुळे भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात व गोदाम पट्ट्यात लागणाऱ्या आगी वेळीच आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.