भिवंडीत मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकून धरणे आंदोलन
By नितीन पंडित | Published: August 28, 2023 02:54 PM2023-08-28T14:54:34+5:302023-08-28T14:55:17+5:30
कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मनपा प्रशासन कचरा उचलण्यास असमर्थ ठरली असल्याने शहरात घाण,दुर्गंधी व आजार वाढले असतांनाही मनपा प्रशासन कचरा ठेकेदारावर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप भिवंडी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आरफात खान यांनी करत थेट महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर सोमवारी कचरा फेकून धरणे आंदोलन केले. अचानक झालेल्या या कचरा फेको धरणे आंदोलनामुळे मनपा मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती.या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इसाम खान, जावेद खान, सलीम खान आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा सुमारे ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमलेला असताना सुद्धा शहरातील अनेक विभागात कचरा तसाच पडून आहे. कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी करत मनपा प्रशासनाचा निषेध केला.
शहरातील अनेक भागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. शांतीनगर या अल्पसंख्याक विभागात पालिका प्रशासना दूजाभाव करीत असून गौसिया मस्जिद परिसरात कचरा उचलला जात नसल्याने पावसाळ्या मध्ये हा कचरा सडून त्या मधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या कचऱ्या मुळे काही संसर्ग आजारांची लागण सुध्दा नागरिकांना होते असल्याचा आरोप आरफात खान यांनी केला आहे.या बाबत पालिका प्रशासना कडे वेळोवेळी तक्रारी करून ही पालिका प्रशासन आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन हे आंदोलन केल्याची माहिती जावेद खान यांनी दिली आहे.सुमारे दोन तास सुरू राहिलेल्या या ठिय्या आंदोलनामुळे पालिका मुख्यालय प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर पालिका आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभागाचे प्रमुख जे एम सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यां सोबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.