भिवंडीत मोहर्रम निमीत्ताने २९ पंजे तर ६८ ताजीया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:56 PM2018-09-21T21:56:53+5:302018-09-21T22:39:50+5:30
भिवंडी: मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ढोल वाजविले जात होते. तर काही ठिकाणी ‘वाज’चे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे शहरातील भोईवाडा भागातील हैदर मजीदमध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. दुपारी हैदर मजीद ते दर्गारोडवरील कोतवाल शा दर्गापर्यंत मिरवणूक काढून ही मिरवणूक विसर्जीत करण्यात आली. या मिरवणूकीसाठी जमलेल्या कुटूंबांमुळे या परिसरांस जत्रेचे स्वरूप आले होते. करमणूकीच्या साधनांबरोबर खेळण्यांची दुकाने देखील येथे थाटलेली होती. आज शुक्र वार असल्याने शहरातील पॉवरलूम उद्योग बंद होते. त्यामुळे कामगार कुटूंबांनी आजचा दिवस आपल्या कुटूंबासह येथे आनंदात घालविला.
दुपारनंतर शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथील इराणी बांधवांनी मोहर्रम निमीत्ताने मिरवणूक काढून आपल्या अंगावर मारून व जखमा करून दु:ख व्यक्त केले. तर गैबीनगर येथुन सायंकाळी निघालेला मोठा ताजीयाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.ही ताजीयाची मिरवणूक व इराणी बांधवांची मिरवणूक एस.टी.स्थानकासमोरील चव्हाण कॉलनीत समाप्त होऊन तेथे पंजा व ताजीया थंड करण्यात आले. शहरात मोहर्रम निमीत्ताने विविध ठिकाणी ताजीयाच्या मिरवणूका काढण्यात आाल्या होत्या. शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात गणेशोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूने मोहरम निमीत्ताने निघालेल्या मिरवणूका शांततापुर्ण वातावरणात संपन्न झाल्या. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी शहरात चोख पोलीस बंदोवस्त ठेवला होता.