भिवंडीत सेनेने उपसले बंडाचे हत्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:36 AM2019-03-13T00:36:11+5:302019-03-13T00:36:29+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती झाल्याचे काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणामही दिसत आहेत.

Bhiwandit Sena's assaulted rebel armor | भिवंडीत सेनेने उपसले बंडाचे हत्यार

भिवंडीत सेनेने उपसले बंडाचे हत्यार

Next

- शाम धुमाळ 

कसारा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती झाल्याचे काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणामही दिसत आहेत. युती होणार नसल्याचे गृहित धरुन ज्यांनी निवडणुकीची तयारी केली होती, त्यांची युती झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. परिणामस्वरूप, काही मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांविरोधात बंडाचे हत्यार जाहीररीत्या उपसल्याने दोन्ही पक्षनेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे.

भिवंडी लोकसभेच्या जागेवर भाजपा आपला हक्क सांगत असली तरी, ही बात येथील बऱ्याच शिवसैनिकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळे पक्षस्तरावर युती झाली असली तरी, स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. युतीची घोषणा झाल्यापासून शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आरोग्य समिती सभापती बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. ते सातत्याने खा. पाटील यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य करीत आहेत. मागील निवडनुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने, तेव्हापासूनच भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांची मने दुभंगली होती. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते. याचा परीणाम म्हणून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये एकामेकांविरोधात संघर्षाची भावना निर्माण झाली. खा. पाटीलही यात मागे नव्हते. त्यामुळे स्थानिक शिवसेना नेते व शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी असंतोष आहे.

भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे वजन वाढल्याने या मतदारसंघावर शिवसेनेकडून नेहमीच दावा केला जातो. परंतु हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असल्याने खा. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांचे विरोधक बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांच्याविरोधात उघडउघड भूमिका घेतली असून, पाटीलविरोधी गटातून त्यांना पाठबळ मिळत आहे.

Web Title: Bhiwandit Sena's assaulted rebel armor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.