भोईर, म्हात्रेंना निलंबित करा, काँग्रेस जिल्हाध्यक्षांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:36 AM2020-01-07T00:36:20+5:302020-01-07T00:36:26+5:30
भाजपच्या उमेदवाराला मत देऊन पक्षनिर्णयाविरोधात कृती केल्याप्रकरणी स्थायी समिती सदस्या हर्षदा भोईर आणि गटनेते नंदू म्हात्रे या दोघांना पक्षातून निलंबित करा,
कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मत देऊन पक्षनिर्णयाविरोधात कृती केल्याप्रकरणी स्थायी समिती सदस्या हर्षदा भोईर आणि गटनेते नंदू म्हात्रे या दोघांना पक्षातून निलंबित करा, अशी तक्रार काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक ३ जानेवारीला झाली. यावेळी शिवसेनेचे गणेश कोट आणि भाजपचे विकास म्हात्रे हे समोरासमोर उभे ठाकले होते. शिवसेनेकडे आठ, भाजपकडे सहा तर काँग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी एक असे १६ सदस्य होते. परंतु, ऐन निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे वामन म्हात्रे आजारपणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडे सात सदस्य होते. याउपरही शिवसेनेचा एक सदस्य अधिक असताना भाजपने काँग्रेसच्या सदस्या हर्षदा भोईर आणि मनसेच्या सरोज भोईर यांच्या मदतीने सभापतीपद पटकाविण्यात यश मिळविले. परंतु, निवडणूक होताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी हर्षदा भोईर यांची कृती पक्षनिर्णयाविरोधात असल्याचे स्पष्ट केले होते, तर पक्षाचे गटनेते नंदू म्हात्रे यांच्या भूमिकेबाबतही पोटे यांनी नाराजी व्यक्ती केली होती. दरम्यान, पोटे यांनी सोमवारी यासंदर्भात थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे.
महाविकास आघाडीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करायचे होते, तसे पक्षादेश (व्हीप) गटनेते नंदू म्हात्रे आणि स्थायी समिती सदस्या हर्षदा भोईर यांना दिले होते. परंतु, त्यांनी शिवसेनेला मतदान न करता भाजपला मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, याकडे लक्ष वेधत पक्षादेश झुगारून एकप्रकारे पक्षाशी बंडखोरी करणारे गटनेते म्हात्रे यांच्यावर पक्षशिस्तभंगाची कार्यवाही करावी व सदस्या भोईर यांचे पक्षांतर कायद्यांतर्गत नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भात निर्देश देण्यात यावेत, असे पत्र पोटे यांनी थोरात यांना दिले आहे. दरम्यान, त्यांच्या या तक्रारीवर वरिष्ठ काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
>जिल्हाध्यक्षांनी केली दिशाभूल
केडीएमसीत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचे गणेश कोट हे महाविकास आघाडीचे उमेदवार नव्हते. आम्ही जो काही निर्णय घेतला तो पक्षविरोधात नाही. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आम्हाला कोणताही व्हीप बजावला नव्हता. त्यांनी केवळ पत्र दिले होते. परंतु, त्यात त्यांनी पूर्णपणे दिशाभूल केली होती. तक्रारीसंदर्भात आम्ही आमची बाजू वरिष्ठांकडे मांडू, असे काँगे्रस गटनेते नंदू म्हात्रे यांनी सांगितले.
फोनवर बोलण्यास नकार
तक्रारीसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्थायी समिती काँग्रेसच्या सदस्या हर्षदा भोईर यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला.