भार्इंदरच्या व्यापाऱ्याला कोट्यावधींचा चुना लावणा-या आरोपीची रवानगी तळोजा कारागृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 08:11 PM2017-11-11T20:11:47+5:302017-11-11T20:11:54+5:30
दिलिपकुमार जैन उर्फ रांका (३५) याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल कारंडे यांच्या पथकाने चेन्नई येथुन काही नुकतीच अटक केली.
ऑनलाईन लोकमत
भाईंदर - पुर्वेकडील जेसल पार्क मध्ये राहणारे कापड व्यापारी नरेंद्र गुप्ता (५३) यांच्यासह परराज्यातीलही व्यापाऱ्यांना कोट्यावधींचा चुना लावणारा आरोपी दिलिपकुमार जैन उर्फ रांका (३५) याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल कारंडे यांच्या पथकाने चेन्नई येथुन काही नुकतीच अटक केली असून सध्या त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीला १९ सप्टेंबरला चेन्नई येथुन ताब्यात घेतले होते. याची सविस्तर माहिती अशी कि, भार्इंदरच्या जेसलपार्क मध्ये राहणारे नरेंद्र गुप्ता यांचा मुंबईच्या काळबादेवी कापड बाजारात घाऊक कापड विक्रीचा कमिशन तत्वावरील व्यवसाय करतात. त्यांची आरोपी सोबत २०१४ मध्ये ओळख झाली. त्यावेळी आरोपीने आपण टेक्स्टाईल कमिशन एजंटचा व्यवसाय चेन्नई येथे करीत असल्याची बतावणी केली होती.
त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने आपल्याला मोठ्याप्रमाणात कापड खरेदी करायचा असल्याचे गुप्ता यांना सांगितले. यावर गुप्ता यांचा विश्वास बसल्याची खात्री पटताच आरोपीने त्यांच्याकडुन क्रेडीटवर मोठ्याप्रमाणात कापड खरेदी केले. या व्यवहारानंतर आरोपीने मार्च ते ऑगस्ट २०१५ दरम्यान गुप्ता यांना पुन्हा गाठुन चेन्नई येथील १६ कपडा व्यापाऱ्यांना सुमारे ३ कोटी किंमतीच्या कापडाची खरेदी करायची असल्याचे सांगितले. गुप्ता यांनी त्याच्यावर विश्वास ठेवुन त्याला परिसरातील ३२ वेगवेगळ्या कापड व्यापाऱ्यांकडुन ३ कोटी २६ लाख ४ हजार ४५९ रुपये किंमतीचे कापड खरेदी करुन दिले.
त्यापोटी आरोपीने त्यांना धनादेश दिले. ते खात्यातील पुरेशा रक्कमेअभावी वटले नाहीत. त्यामुळे गुप्ता यांनी इतर व्यापा-यासह थेट चेन्नई गाठली. परंतु, तेथील दुकान गेल्या २३ महिन्यांपासुन बंद असल्याचे लगतच्या दुकानदारांकडुन सांगण्यात आले. यानंतर त्यांनी विक्री केलेल्या त्या १६ कापड खरेदीदारांच्या कार्यालयात गेले असता तेथे तसे कार्यालयच नसल्याचे उघडकीस आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी मुंबईतील काळबादेवी पोलिसांत १६ जून २०१६ रोजी आरोपी दिलिप विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी त्याला चेन्नई येथुन अटक केली. तत्पुर्वी आरोपीने गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, कर्नाटकमधील बंगळुरू, राजस्थानमधील पाली आदी ठिकाणच्या कपडा व्यापाऱ्यांना सुद्धा ठगविल्याचे उघडकीस आल्याने हैदराबाद पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नुकतेच ताब्यात घेतल्याचे कारंडे यांनी सांगितले.