उल्हासनगरात ४५० कोटीच्या निधीतून ५ मुख्य रस्त्याचे भूमिपूजन, रस्ते होणार चकाचक
By सदानंद नाईक | Published: May 9, 2023 08:06 PM2023-05-09T20:06:48+5:302023-05-09T20:07:27+5:30
शहरातील मुख्य ५ रस्त्याचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते
उल्हासनगर : शहरातील मुख्य ५ रस्त्याचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी सी ब्लॉक डॉल्फिन क्लब येथे झाले. पाच रस्त्यासाठी ४५० कोटीच्या निधीला एमएमआरडीएने मंजुरी दिली असून शहरातील रस्ते चकाचक होणार असल्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनीं दिले.
उल्हासनगर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी प्रसिद्ध असून ७५ टक्के पेक्षा जास्त रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. येत्या दोन वर्षात शहरातील संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा मानस आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून कैलास कॉलनी ते नेताजी चौक, न्यु इंग्लिश स्कुल ते लालचक्की, सी ब्लॉक साई बाबा मंदिर ते डॉल्फिन क्लब, सोमर चौक ते कायंडे वाया शारदा रस्ता व हिराघाट ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता सिमेंट काँक्रीटचे बांधण्यासाठी एमएमआरडीएने ४५० कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी ८ वाजता झाले.
राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आल्यानंतर, शहराला १२६१ कोटीचा निधी विविध विकास कामाला दिल्याची माहिती यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी दिली होती. रस्त्याचे भूमिपूजन झाले असून भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा वितरण योजनेचा तिसरा टप्प्याचे भूमिपूजन बाकी असल्याचे मत खासदार शिंदे यांनी व्यक्त केले. भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता प्रशांत साळुंके, उपअभियंता संदीप जाधव, अश्विनी आहुजा यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहर विकासासाठी पुन्हा निधी आणणार असल्याचे आश्वासन दिले.