पश्चिमेवरुन दहिसर ते भाईंदर जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे पुढील महिन्यात होणार भूमिपूजन
By धीरज परब | Published: July 17, 2023 04:45 PM2023-07-17T16:45:44+5:302023-07-17T16:46:09+5:30
नागरिकांना मिळणार टोल फ्री रस्ता ?
मीरारोड - मुंबईच्या दहिसर ते मीरा भाईंदर पश्चिम परिसराला जोडणारा अनेकवर्ष प्रतीक्षेत असलेल्या लिंक रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ऑगस्ट महिन्यात त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . या रस्त्यामुळे दहिसर चेकनाका व पूर्व पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सुद्धा फुटून नागरिकांना टोलफ्री रस्ता मिळणार आहे .
मीरा भाईंदर आणि वसई विरारच्या नागरिकांना मुंबईला रस्ते मार्गाने जोडणारा एकच रस्ता आहे. राष्ट्रीय महामार्ग वरून दहिसर चेकनाका येथे टोल भरून लोकांना मुंबईत ये - जा करावी लागतेय . लोकसंख्या आणि वाहनसंख्या प्रचंड वाढल्याने दहिसर चेकनाका येथे टोलनाका मुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . त्यातच भाईंदर पश्चिम भागातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी पूर्वे वरून चेकनाका येथूनच जावे लागते . त्यामुळे दहिसर पश्चिमेचा लिंक रोड मीरा भाईंदर पश्चिमेस विस्तारित करण्याची मागणी अनेकवर्षां पासूनची आहे .
आ . सरनाईक यांनी सदर रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षां पूर्वी तत्कालीन राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडे पत्र दिले होते . त्या अनुषंगाने १६ डिसेम्बर २०२१ रोजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आयोजित केलेल्या बैठकीला सरनाईक सह अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु, एमएमआरडीचे अतिरिक्त आयुक्त गोविंद राज, मीरा भाईंदर पालिका आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते .
रस्त्याचा खर्च मोठा असल्याने तेव्हा नगरविकास मंत्री असलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा केल्या नंतर मुंबई महापालिका खर्च करणार असून त्यासाठी सुमारे ३ हजार कोटींचा खर्च होणार आहे . ह्या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात आहे .
दहिसर लिंक रोडपासून भाईंदरपर्यंत साधारण ६ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद रस्ता बांधणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत १.५ किमी व ४.५ किमी रस्ता मीरा भाईंदर हद्दीत असेल. या रस्त्या मुळे भविष्यात मीरा भाईंदरच्या नागरिकांना मुंबईशी जाणे येणे सहज सोपे होणार आहे. पूर्व पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सुटून टोलच्या भुर्दंडातून नागरिकांची सुटका होणार आहे . या रस्त्याच्या मार्गात काही ठिकाणी खारभूमी व कांदळवन असल्याने तेथे उन्नत मार्ग ( एलिव्हेटेड) रस्ता होणार आहे . कांदळवन क्षेत्र वाचवून निसर्गाचे जतन करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे आ. सरनाईक यांनी सांगितले .