डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:11 AM2018-03-23T01:11:04+5:302018-03-23T01:11:04+5:30

डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे.

Bhopal of Dombivli, fear of Anand Paranjpe and the dismantling of factories | डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी

डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी

Next

डोंबिवली : डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे. नाहीतर भविष्यात डोंबिवलीचे भोपाळ होऊ शकते, अशी भीती माजी खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. कल्याण- डोंबिवली पालिकेकडे पैसे नसतील, त्यामुळे विकासकामे होत नसतील तर बिल्डरांचा ओपन लॅण्ड टॅक्स कमी का केला? त्याच न्यायाने नागरिकांचा करही कमी करायला हवा. बिल्डर आणि सामान्यांना समान न्याय द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
कल्याण-डोंबिवलीचा मी लोकप्रतिनिधी होतो. त्यामुळे मी डोंबिवलीला घाणेरडे शहर म्हणू शकणार नाही. एवढे साक्षर शहर असतानाही येतील नागरिक लोकप्रतिनिधींना प्रश्न का विचारत नाहीत. परंपरागत मतदारांनी आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला हवे. एवढी वर्षे सत्ता असूनही आज आपण मागे का? याचा जाब आपण विचारणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी केला.
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वातार्लापात परांजपे बोलत होते. ते म्हणाले, मी खासदार असताना गटार आणि पायवाटा अशा नगरसेवकांच्या कामांपेक्षा खासदार पदाला शोभतील, अशा कामांवर जास्त भर दिला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ८० टक्के मतदार हे रेल्वेने प्रवास करणारे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्रासदायक ठरणाऱ्या प्रवासातून दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रकल्पांना मी प्राधान्य दिले. त्यात कल्याण ते ऐरोली रेल्वेमार्ग, पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचे काम, कल्याणच्या पुढे तिसरी रेल्वे मार्गिका, ठाकुर्लीतील उड्डाणपूल, सरकते जिने यासाठी पाठपुरावा केला. मोठा गाव ते माणकोली पूल, रिंगरूट, कल्याण-शीळ मागार्चे रुंदीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी प्रयत्नशील होतो. २०१९पर्यंत हे प्रकल्प पूर्ण झाले तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा त्यामागील उद्देश होता. खासदारपदी निवडून आल्यानंतर डॉ. शिंदे यांना मी हे प्रकल्प पूर्ण करून घेण्याबाबत बोललो. पण तसे झाले नाहीत. नवीन प्रकल्प तर अद्याप दूरच आहेत, असे सांगत विकास करून घेण्यात ते कमी पडत आहेतच. पण सत्तेतील भाजपाकडूनही कामे होताना दिसत नाहीत. येत्या १० वर्षांत मतदारसंघात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचा खासदार म्हणून विचार करून काम करायला हवे. परंतु, शिवमंदिर महोत्सव सोडला तर डॉ. शिंदे यांचे काम काय?, असा परखड सवालही परांजपे यांनी या वेळी केला.

खासदारांची प्रत्येक बैठक पालकमंत्र्यांच्या कुशीतच
कल्याण लोकसभा मतदारसंघाततील रेल्वे, रस्ते, पायाभूत प्रकल्प पूर्ण करून घेण्यात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सत्ताधारी भाजपा अपयशी ठरल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली. डॉ. शिंदे हे तर पालकमंत्र्यांचे बोट धरूनच प्रवास करत आहेत. त्यांची प्रत्येक बैठक ही पालकमंत्र्यांच्या कुशीत होते, अशी तिरकस टीकाही परांजपे यांनी केली.
सत्ताधाºयांकडे विकासाचा अजेंडा, दृष्टीकोनच नाही. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार परस्परांशी स्पर्धा करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्या अशा बेजबाबदार वागण्याचे दुष्परिणाम दोन्ही मतदारसंघांतील विकासकामांवर होत आहेत, असे ते म्हणाले.
मी खासदार असताना प्रत्येक प्रकल्पासाठी एकटाच केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातील संबंधितांची भेट घेत असे. एकदाही माझ्यावर तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांना सोबत घेऊन जाण्याची वेळ आली नाही. परंतु, डॉ. शिंदे यांची प्रत्येक बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्हे तर कुशीतच होते, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

‘पक्ष सांगेल तिथून लढणार’
आगामी काळातील राजकीय वाटचालीसंदर्भात परांजपे म्हणाले, मला पक्ष सांगेल तेथून मी निवडणूक लढवणार. ठाणे आणि कल्याणमधील नागरिकांशी आताही माझा संपर्क आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण असे लोकसभेचे दोन पर्याय माझ्यापुढे आहेत. पक्षाने सांगितले तर खासदार म्हणून अन्यथा आमदार म्हणूनही लढेन. पण पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री आयुक्तांकडे,
तर राज्यमंत्री अतिरिक्त आयुक्तांकडे
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विकास तीन वर्षांपासून खुंटला आहे. कारण सत्ताधाºयांचा प्रशासन आणि अधिकारी यांच्या वचक राहिलेला नाही. अधिकारी आणि लोकनेते यांच्यात ताळमेळ दिसत नाही. कारण पालकमंत्री हे ठाणे महापालिका आयुक्तांकडे, कल्याण-डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे, तर खासदार डॉ. शिंदे हे पालकमंत्र्यांकडे जाऊन बसतात. त्यामुळे विकास होताना दिसत नाही. पूर्वी अधिकारी आमच्याकडे येत असत आणि आमचा संवादही होत असे, याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले.

‘शिंदे, हिंदुराव यांचा पुढाकार हवा’ : विरोधक म्हूणन कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील प्रश्न हाती घ्यायला हवेत. पण तसे होताना दिसत नाही. आंदोलने केली जात नाहीत. आमदार जगन्नाथ शिंदे आणि प्रमोद हिंदुराव यांनी कल्याण-डोंबिवलीत जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, पण तेही पुढाकार घेत नाहीत, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

दिवा आणि बुलेट ट्रेन : मुंबईहून अहमदाबादला जाणाºया बुलेट ट्रेनशी दिव्याचा काय संबंध, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यासाठी जर दिव्यात भूसंपादन सुरू असेल, तर खासदारांनी याबाबत जागरूक असायला हवे. मीही याबाबत माहिती घेईन, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सध्या कोणतीही आॅफर नाही! : भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा थेट प्रश्न विचारताच त्यांनी हसत सांगितले, मला अजूनही कोणत्याही पक्षाची आॅफर नाही. माध्यमांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. येत्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Bhopal of Dombivli, fear of Anand Paranjpe and the dismantling of factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे