शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यास भोसले हत्याप्रकरणी अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी; एकूण सात जण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:25 PM2024-02-23T12:25:40+5:302024-02-23T12:27:11+5:30
१४ फेब्रुवारीला क्षुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला होता.
भिवंडी : संकेत भोसले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेच्या शिंदे गटाचा उपशहरप्रमुख कैलास धोत्रे याच्यासह दोघा आरोपींना बुधवारी रात्री उशिरा शहर पोलिसांनी अटक केली. तर अन्य एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे.
१४ फेब्रुवारीला क्षुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. उपचारादरम्यान संकेत याचा मृत्यू झाला. त्या नंतर पोलिसांनी संकेतला मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रेचे साथीदार करण लष्कर, दिनेश मोरे व चंदन गौड यांना अटक केली होती.
पोलिसांची वेगवेगळी पथके
हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी स्थापन केलेल्या पोलिस पथकाने बुधवारी रात्री उशिरा मुख्य आरोपी कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना अटक केली. तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे याला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत संकेत याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांसह स्थानिकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्य ओळखून या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके बनवली होती.
गुरुवारी दुपारी कैलास धोत्रे, आकाश, विशाल यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी वऱ्हाळदेवी नगर, धामणकर नाका, न्यायालय व सबजेल परिसरात बंदोबस्त ठेवला होता.