महिलांच्या डब्यातील प्रवास होमगार्डला भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:43 AM2018-07-21T05:43:29+5:302018-07-21T05:43:35+5:30
सीएसएमटी-टिटवाळा या लोकलमधून महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या हरेंद्र सिंह या होमगार्डला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन आरपीएफ अधिका-यांच्या हवाली केले.
डोंबिवली : सीएसएमटी-टिटवाळा या लोकलमधून महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या हरेंद्र सिंह या होमगार्डला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन आरपीएफ अधिका-यांच्या हवाली केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला शुक्रवारी रेल्वे न्यायालयात हजर केले.
हरेंद्रने गुरुवारी सायंकाळी सीएसएमटी-टिटवाळा लोकल दादर स्थानकात पकडली. दादरला ड्युटी करून घरी चालल्याचे त्याने महिलांना सांगितले. प्रवाशांनी घाटकोपरला उतरण्यास सांगितले. मात्र, त्याने कानाडोळा केल्याचे रेखा देढिया यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त महिलांनी त्यास डोंबिवली स्थानकात उतरवून जाब विचारला. त्याने होमगार्ड असून गर्दीमुळे महिला डब्यात चढल्याचे सांगत नाव सांगण्यास नकार दिला. त्यामुळे महिला प्रवाशांनी त्याची माहिती उपनगरीय रेल्वे एकता प्रवासी संस्थेच्या पदाधिकारी लता अरगडे यांना दिली. याबाबत त्यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. हरेंद्रला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरपीएफ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला.