मातृभाषेसाठी डोंबिवलीच्या तरुणाची भारतभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:08 AM2018-06-26T01:08:27+5:302018-06-26T01:08:30+5:30
करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात.
डोंबिवली : करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात. मात्र, तरीही पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांकडेच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घ्या आणि मातृभाषेचा अभ्यास करा, असा संदेश देण्यासाठी डोंबिवलीतील गंधार कुळकर्णी यांनी ५०० दिवसांची सायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखली आहे. ती पूर्ण झाल्यावर भाषा अध्यायन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे आणि नावीन्यपूर्ण मॉडेल तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
गंधार हे १ जुलैला डोंबिवलीहून या भ्रमंतीला प्रारंभ करतील. १२ जुलैपर्यंत ते नागपूरला पोहोचतील. त्यापुढे १३ जुलैला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताच्या मार्गाने रामटेकहून निघून हरिद्वारला जाणार आहेत. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जोडणारा, असा त्यांनी पुढचा मार्ग आखला आहे. या संपूर्ण प्रवासात ते २० हजार किलोमीटर सायकल चालविणार आहेत. दररोज एका शाळेत दीड ते दोन तास जाऊन ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी ‘भाषेचे अध्ययन आणि अध्यापन’ या विषयावर संवाद साधणार आहेत. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा, यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वत:च्या भाषेविषयी जाणीव करून देणे, स्थानिक बोलींची ओळख व्हावी, यावर त्यांचा भर असणार आहे. तसेच त्यासाठी शब्दांची एक यादी त्या-त्या बोलीत अनुवादित करून घेणे, भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्याच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघावे, याची जाणीव ते या मोहिमेत करणार आहेत.
प्रयोगशीलतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे केवळ नोकरदार वर्ग निर्माण होत आहे. शिक्षणाचे हे स्वरूप बदलले पाहिजे, असे कुलकर्णी म्हणाले. या मोहिमेत त्यांनी घरगुती निवासाची व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे सामानाची आणि स्वत:ची सुरक्षितता ठेवता येणार आहे. आपल्या भारतात ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती रूजलेली असल्याने या पद्धतीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.
कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम.एची पदवी मिळवली आहे. या विभागाने त्यांच्या या मोहिमची दखल घेतली आहे. ज्ञानप्रबोधिनी, डोंबिवली विस्तार केंद्राचा या मोहिमेत मोठा वाटा आहे. एका जर्मन कंपनीने त्यांना ३४ हजारांची हेलिक्स ३.५ आय ही सायकल देऊ केली आहे. असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदत ही प्रवासादरम्यान होणार आहे. भारत परिक्रमा करून आलेले सचिन गावकर यांचे मार्गदर्शन कुलकर्णी यांना लाभले आहे. या प्रवासात २०० शाळांना भेटी देण्याचा मानस आहे. त्यासाठी चार लाखांचा खर्च आहे.