मासुंदा तलाव ते जाफर नालापर्यंतच्या कल्व्हर्टचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:38+5:302021-03-04T05:16:38+5:30
ठाणे : मासुंदा तलाव ते जाफर नालापर्यंत असलेल्या कल्व्हर्टच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी ठाण्याचे खा. राजन विचारे यांच्या हस्ते ...
ठाणे : मासुंदा तलाव ते जाफर नालापर्यंत असलेल्या कल्व्हर्टच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी ठाण्याचे खा. राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामामुळे परिसरात पावसाळ्यात यापुढे पाणी तुंबणार नसल्याचे स्पष्ट केले.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मासुंदा तलाव हा दरवर्षी पावसाळ्यात भरून ओसांडून वाहू लागतो. त्यामुळे तलावातील पाणी शेजारी असलेल्या बाजारपेठेमध्ये घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्याचा नाहक त्रास नागरिकांनाही होत असतो. हे टाळण्यासाठी खा. विचारे यांनी मासुंदा तलाव ते जाफर नालापर्यंत अरुंद असलेला कल्व्हर्ट मोठा करून पाणी खाडीमार्गे सोडण्यासाठी या कामाला मंजुरी मिळविली. परंतु, या कामासाठी निधीची आवश्यकता असल्याकारणाने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांची १३ नोव्हेंबर २०१९ रोजी भेट घेऊन व्यथा मांडली. आयुक्तांनी या कामाचे गांभीर्य ओळखून तत्काळ ६० लाख निधी मंजूर करून कामास सुरुवात केली. या कामासाठी लागणारी वाहतूक शाखेची परवानगीही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडून मिळवून घेतली. यावेळी बाजारपेठेमधील व्यापारी संघटनेच्या वतीने खासदारांचे जाहीर आभार मानले. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका व उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, माजी नगरसेवक पावन कदम, विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, कमलेश श्रीमाळ, उपविभागप्रमुख अज्जू देहेरकर, शशिकांत गुरव, शाखाप्रमुख वैभव ठाकूर, राजू ढमाले, सुशांत उतेकर, ठाणे महानगरपालिकेचे उपकार्यकारी अभियंता भगवान शिंदे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.