उत्तन जवळील समुद्रात दीपस्तंभाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:23+5:302021-03-17T04:41:23+5:30
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन जवळील समुद्रात असलेल्या खडकावर दीपस्तंभ उभारण्याच्या कामाचे खासदार राजन विचारे यांनी भूमिपूजन ...
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन जवळील समुद्रात असलेल्या खडकावर दीपस्तंभ उभारण्याच्या कामाचे खासदार राजन विचारे यांनी भूमिपूजन केले. दीपस्तंभामुळे रात्रीच्यावेळी खडकांवर आदळून मासेमारी बोटींना होणारे अपघात टळून मच्छीमारांचे नुकसान होणार नाही असे विचारे यांनी सांगितले.
उत्तन - पाली व चौक भागातील मच्छीमारांची १० वर्षांपासून समुद्रातील खुट्याची वाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खडकावर दीपस्तंभ उभारण्याची मागणी होत होती. या ठिकाणी दीपस्तंभ उभारण्याची मागणी विचारे यांनी केली होती. २०१८-१९ च्या जिल्हा नियोजनामध्ये ९० लाखांचा निधी उपलब्ध करून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत दीपस्तंभाच्या कामास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सोमवारी समुद्रात बोटींनी जाऊन विचारे यांनी दीपस्तंभाचे जलभूमिपूजन केले. हे काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे.
यावेळी आमदार गीता जैन, मच्छीमार नेते प्रमुख बर्नाड डिमेलो, नगरसेवक एलायस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, स्थानिक मच्छीमार जमातीचे पाटील कलमेत गौऱ्या, डिक्सन डीमेकर, मॅक्सी नेतोगर, ऑस्कर ग्रेसेस, वासुदेव मयेकर आदी उपस्थित होते. कातल्याची वाट, वाशी खडक आणि सऱ्याची वाट या तीन खडकांवर दीपस्तंभ लावण्याच्या सूचना विचारे यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर उत्तन भुतोडी व पातान बंदरावरील जेटीच्या कामाच्या स्थळाची पाहणी केली. लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.