भार्इंदर पालिकेचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:21 AM2018-10-01T04:21:54+5:302018-10-01T04:22:23+5:30
दुभाजक, गतिरोधक बसवण्यास टाळाटाळ : वाहतूक शाखेने पत्र देऊन झाले नऊ महिने, कार्यवाहीच नाही
मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दुभाजक व गतिरोधक बसवण्यास वाहतूक पोलिसांनी कळवूनही नऊ महिने झाले तरी महापालिका मात्र ढिम्मच आहे . या ठिकाणी सतत होणारे अपघात व शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवाला असलेला धोका पाहता पालिका व नगरसेवकांचे डोळे उघडावेत म्हणून दोन आक्टोबरला स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
भार्इंदर पश्चिमेचा हा दुसरा मुख्यमार्ग असून फाटकापासून नाकोडा रु ग्णालय नाका पर्यंत रडत - रखडत सिमेंटचा रस्ता झाला. नव्याने बनवलेल्या या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन यात टक्केवारी भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही झाले होते. हा रस्ता काही भागात सिमेंटचा झाल्याने पालिकेने मध्यभागी दुभाजक बसवण्यास जागा ठेवली आहे. परंतु आजतागायत दुभाजक तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवलेले नाहीत. त्यामुळे मार्गिका सोडून भरधाव वाहने चालवली जातात. दुभाजक व गतिरोधक नसल्याने येथे सतत लहानमोठे अपघात होतात. यात काही जण किरकोळ जखमी झाले असून काहींना दुखापत झालेली आहे .
येथील सेंट झेवियर्स शाळा असून मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. तर इंदिरा नगर कोठार झोपडपट्टीतील रहिवाशांना नैसर्गिक विधीसाठी हाच रस्ता ओलांडून समोरच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी व रहिवाशांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा
लागतो. सिमेंटच्या रस्त्यावर दुभाजक व गतिरोधक बसवण्यासाठी फेब्रुवारीमध्ये जय मल्हार प्रतिष्ठान, अर्कफाऊंडेशन आदींनी महापालिकेपासून थेट मुख्यमंत्र्यांच्या पोर्टल वर मागणी केली होती. जय मल्हार फाऊंडेशनने यासाठी सतत पाठपुरावा चालवला होता.
त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने पाहणी केल्यावर वाहतूक शाखेचे निरीक्षक जगदीश शिंदे यांनी कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना
पत्र देऊन या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक बसवण्यास सांगितले होते.
अधिकाऱ्याने दिले चमत्कारिक उत्तर
वाहतूक शाखेने सात मार्च रोजीच दुभाजक व गतिरोधक बसवण्यास पत्र दिले असताना खांबित यांनी मात्र १३ मार्च रोजी वाहतूक शाखेची परवानगी मिळाल्या नंतर पुढील कार्यवाही करू असे आश्चर्यकारक उत्तर जय मल्हार प्रतिष्ठानचे राजेश जवळकर यांना दिले होते. महापालिकाच दुभाजक व गतिरोधक बसवण्यास टाळाटाळ करत असून स्थानिक नगरसेवकही डोळेझाक करत आहेत.