मतदान घटल्याने उंचावल्या दोन्ही उमेदवारांच्या भुवया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:10 AM2019-05-02T04:10:03+5:302019-05-02T04:10:24+5:30
ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे;
अजित मांडके
ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे; परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे ३ लाख मतदार वाढलेले असतानाही मतदानाचा टक्का मात्र १.६४ टक्यांनी घटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या किंचितशा घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला होणार? आणि धक्का कोणाला बसणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदार होते. पैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. असे असले तरी मतांचा टक्का हा १.६४ टक्यांनी घटला आहे. त्यामुळे या घटलेल्या मतांची चर्चा आता सुरू झाली आहे. ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या गडावर कब्जा केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे पुन्हा शिवसेनेने गड राखला. २०१९ च्या निवडणुकीत वाढलेल्या तीन लाख मतदारांमुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत होती; परंतु तसे काही घडले नाही. उलट मतदानाची टक्केवारी १.६४ टक्क्यांनी घटली.
विधानसभानिहाय विचार केल्यास ठाणे विधानसभा मतदारसंघ वगळता मीरा-भाईंदरमध्ये ३ टक्क्यांनी मतांचा टक्का घसरला आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही २.५० टक्क्यांनी मतदानाचा टक्का कमी झाला आहे. कोपरी-पाचपाखाडीमध्येही २ टक्क्यांनी मतदान घटले आहे. ऐरोली आणि बेलापूर हे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात असले, तरी या ठिकाणीसुद्धा मतदानाचा टक्का हा घसरला आहे. ऐरोली मतदारसंघात जवळजवळ ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बेलापूर मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी या मतदारसंघातही १ टक्के कमी मतदान झाले आहे. या सर्वच मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. ठाण्यात मात्र पाऊण टक्का मतदान वाढले आहे. आता त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे याकडे लक्ष लागले आहे. २मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी १ लाख १२ हजार ६९७ मते आता निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते कोणाच्या झोळीत जाणार? त्यावरच विजयाची गुढी उभारली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे मतदानात घट झाली आहे. तसेच मतदार याद्यांमधील घोळ, यादीतून गहाळ झालेली नावे आणि निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या ढिसाळ व्यवस्थेचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाला आहे. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार
सलग पाच दिवस आलेल्या सुट्टी आणि उन्हाचा पारा यामुळे मतदान कमी झालेले दिसते; परंतु यामुळे फारसा काही फरक पडेल, असे वाटत नाही. आमच्या पारंपरिक मतदारांनी उत्साह दाखविला आहे. - राजन विचारे, शिवसेना उमेदवार