ठाण्यातील सत्ताधारी व प्रशासनाचा लसीकरण मोहिमेत पक्षपातीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:54+5:302021-09-18T04:43:54+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत पक्षपात केला जात असून, सत्ताधारी व प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरण मोहिमेसाठी प्राधान्य दिले ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत पक्षपात केला जात असून, सत्ताधारी व प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरण मोहिमेसाठी प्राधान्य दिले जात आहे. ‘देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची ऊठबस’ अशी स्थिती असल्याचा आरोप भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे सुरू असलेल्या सेवा सप्ताहात महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण शिबिर घेण्यात येणार होते. त्याला महापालिकेने नकार दिला. या पार्श्वभूमीवर सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाच्या पक्षपाती निर्णयावर टीका केली. या वेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर हेही उपस्थित हाेते.
देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळाली पाहिजे, अशी पंतप्रधान मोदी यांची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून ठाण्यात राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासनाकडून लसीकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. लस एका पक्षाची नाही, महाविकास आघाडीची तर बिलकूल नाही. ती केंद्र सरकारची आहे. ठाण्यात राजकीय पक्षबाजीसाठी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांना लसीकरणाची शिबिरे दिली जातात. एखाद्या आपत्तीत नागरिकांच्या तोंडचा घास काढून घेणे, हे महाभयानक पाप आहे. महापालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून लसीकरण मोहीम राबवू नये. अन्यथा, गंभीर परिणाम होतील, असा इशाराही खा. सहस्रबुद्धे यांनी दिला. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना ठाणे महापालिकेने लसीकरणात चालविलेल्या चांगल्या उपक्रमांची माहिती दिली होती. तसेच त्यांच्याबरोबर आयुक्तांची भेटही घडवून आणली होती. मात्र, भाजपने लसीकरणात कोणतेही राजकारण केले नव्हते, असे सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे.
..........
वाचली.