दुचाकी खड्ड्यात आदळली, डॉक्टर थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:13 AM2019-07-09T00:13:21+5:302019-07-09T00:13:24+5:30

मानपाडा रोड-आइस फॅक्टरी ते जिमखाना रस्त्यावर घटना : रस्त्यांच्या अवस्थेबाबत आयुक्तांना पाठवला ई-मेल

A bicycle hit the pit, doctors briefly escaped | दुचाकी खड्ड्यात आदळली, डॉक्टर थोडक्यात बचावले

दुचाकी खड्ड्यात आदळली, डॉक्टर थोडक्यात बचावले

Next

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे काही दिवसांतच रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचा जीव आता धोक्यात येऊ लागला आहे. शहरातील डॉ. आनंद हर्डीकर हे रविवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात जोरदार आदळली. यावेळी त्यांनी कशीबशी गाडी सावरल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, जागोजागी पडलेले खड्डे पाहून त्यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना ई-मेल पाठवून जीवितहानी झाल्यावरच खड्ड्यांची दखल घेतली जाणार का, असा संतप्त सवाल केला आहे.


यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले, तरी काही रस्त्यांची कामे ठरावीक मुदतीत केडीएमसी व अन्य प्राधिकरणांना मार्गी लावता आलेली नाहीत. तर, काही रस्त्यांवरील डांबर सध्याच्या मुसळधार पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील मॅनहोलच्या चेंबरभोवतीचे डांबर, काँक्रिट उखडल्याने तेथे खड्डे पडले आहेत. शहरातील निवासी विभाग, तसेच काही ठिकाणी रस्त्यांना जोडणाऱ्या मुख्य चौकांतही खड्डे पडले आहेत. अशा खड्डेमय स्थितीत असलेल्या मानपाडा रोड ते आइस फॅक्टरी रस्त्यावरून डॉ. हर्डीकर रविवारी सकाळी ८ वाजता दुचाकीने डोंबिवली जिमखान्यात जात असताना त्यांची गाडी खड्ड्यात आदळली. यावेळी त्यांनी गाडी कशीबशी सावरल्याने ते थोडक्यात बचावले. परंतु, अन्य कोणाला दुखापत होऊ नये, यासाठी आयुक्तांना खरमरीत मेल पाठवून रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे हर्डीकर यांनी लक्ष वेधले आहे. तसेच जीवितहानी झाल्याशिवाय दखल घ्यायची नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे.

जीव गेल्यावरच जाग येणार का?
आमच्याकडून कर वसूल करताना केडीएमसीला विसर पडत नाही, मग रस्ते सुधारण्याकडे दुर्लक्ष का होते. ही नेहमीचीच परिस्थिती आहे. पण सुधारणा करण्याकडे मात्र कानाडोळा केला जातो. एखाद्या ठिकाणी बळी गेल्यावर यंत्रणा जागी होते, मग आता मानपाडा रोड ते डोंबिवली जिमखाना या रस्त्याची झालेली चाळण पाहता येथेही जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल डॉ. हर्डीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

आयुक्तांकडून प्रतिसाद नाही
दरम्यान, यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी ‘लोकमत’ने मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: A bicycle hit the pit, doctors briefly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.