टेक्नो फन फेअरमध्ये सौरऊर्जेवरील सायकलचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:15 AM2019-06-19T01:15:46+5:302019-06-19T01:15:57+5:30

उत्पादकांना ग्राहक मिळवून देणे हा उद्देश

Bicycle rentals on solar energy in the Techno Fun Fair | टेक्नो फन फेअरमध्ये सौरऊर्जेवरील सायकलचे आकर्षण

टेक्नो फन फेअरमध्ये सौरऊर्जेवरील सायकलचे आकर्षण

Next

बदलापूर : बदलापूर येथील भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये टेक्नो फन फेअर झाले. या फेअरमध्ये सौरऊर्जेवरील सायकल सर्वांचे आकर्षण ठरली. या सोबत अनेक यंत्र या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

रोबोट फुटबॉल, काऊंटर स्ट्राईकबरोबरच सौरऊर्जेवर एकाचवेळी ५० किलोमीटर धावणारी सायकल, सायकलवरील विजेचा बल्ब, सायकलने फिरणारे मिक्सर, दरवाजा उघडा राहिल्यास वाजणारी अलार्म यंत्रणा, आपत्तीच्यावेळी उंच इमारतीवरून सुटका होण्यासाठी स्काय सेव्हर आदी वैशिट्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी संधी देण्याबरोबरच नावीन्यपूर्ण उत्पादनांना ग्राहक मिळवून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे झालेल्या टेक्नो फन फेअरचे उद्घाटन सोमवारी झाले.

सौरऊर्जेवरील सायकलची किंमत ३० हजार असून, ती प्रतीतास ४० किलोमीटर धाऊ शकेल. या सायकलची क्षमता एकाचवेळी ५० किलोमीटर धावण्याची आहे. प्रत्येक मजल्यावर फायर रोप लावल्यास रहिवाशांची वेगाने सुटका करता येईल. या प्रकल्पांबरोबरच रोबोट फुटबॉल, अत्यल्प काळात थ्रीडी प्रिटींग करणारी यंत्रणा, ड्रोन मागील संपूर्ण तंत्रज्ञानाच्या माहितीबरोबरच ड्रोन हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

भारत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बायोगॅसवर चालणाऱ्या दुचाकीचे इंजिन तयार केले आहे. अशा प्रकारची इंजिन तयार केल्यास पेट्रोलऐवजी बायोगॅसचा वापर करून इंधन खर्चात बचत करता येईल असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. गुरूवारपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. सकाळी दहा ते चार यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या कार्यक्र माला वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार जयेश खाडे, हरीश अय्यर, प्रकाश पै, एस. एस. ठाकूर, संदीप कुलकर्णी, संस्थेचे सचिव प्रा. संदीप सहारे, विश्वस्त प्रा. श्रीमती एस. एस. हेगडे, प्राचार्य एस. एन. बराई आदी उपस्थित होते.

सोशल मीडिया फार चांगली संधी
डिजिटल मार्केटिंगसाठी चांगली सरकारी योजना आली आहे. स्टार्टअप साठी कोणीही संधी उपलब्ध करून देत नाही, आम्ही ती संधी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या माध्यमातून दिली आहे. सोशल मीडिया ही फार चांगली संधी आहे. या माध्यमातून चांगला व्यवसाय करू शकतो असे मत वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार जयेश खाडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Bicycle rentals on solar energy in the Techno Fun Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.