Thane: विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोघे जखमी, ठाण्यातील ब्रम्हांड पातलीपाडा येथील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: August 2, 2024 06:11 PM2024-08-02T18:11:02+5:302024-08-02T18:11:15+5:30
Thane News: टायर पंक्चर झाल्याने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार वेगाने आलेल्या टेम्पोने मागून धडक दिली. याचदरम्यान त्या टेम्पोची दुचाकीलाही धडक बसून झालेल्या विचित्र अपघातात बाळकुम येथील रहिवासी वैभव डावखर (२७) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - टायर पंक्चर झाल्याने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार वेगाने आलेल्या टेम्पोने मागून धडक दिली. याचदरम्यान त्या टेम्पोची दुचाकीलाही धडक बसून झालेल्या विचित्र अपघातात बाळकुम येथील रहिवासी वैभव डावखर (२७) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पो चालक धर्मेंद्र यादव (४०) आणि ब्ल्यू डार्ट कंपनीचे सुरक्षारक्षक सुनील बाकरे (३८) असे दोघे जण जखमी झाले आहेत. पंक्चर झालेल्या ट्रकचे मालक हे भिवंडीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांचा असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
अमरनाथ यादव हे चालक मातीने भरलेला ट्रक मुंबईतून भिवंडी येथे घेऊन जात होते. हा ट्रक पंक्चर झाल्यामुळे त्यांनी तो ट्रक माजिवाडा, गोल्डन डाइज ब्रिजच्या सुरुवातीला उभा केला. याचदरम्यान, मुंबईकडून वडपे या ठिकाणी भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने त्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. याशिवाय, तिथून दुचाकीवरून घरी निघालेल्या वैभव डावखर यांच्या दुचाकीलाही धडक दिली. या अपघातात डावखर हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात टेम्पो चालक यादव आणि त्याच्या सोबत असलेला सुरक्षा रक्षक सुनिल बाकरे असे दोघे जखमी झाले. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चालकाच्या डोक्याला आणि पोटाला तर सुरक्षारक्षक याच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेत मदतकार्य राबवले.
अपघातामुळे त्या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाल्याने अपघातग्रस्त वाहने टोईंग वाहनांच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. रस्त्यावर सांडलेल्या आॅईलवर पाण्याचा मारा करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.