सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:39 AM2021-01-03T00:39:18+5:302021-01-03T00:39:29+5:30

२०० रुपये दंड नावालाच : प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष

Bidi-cigarettes in public; No penalty | सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही

सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही

Next

हुसेन मेमन
लोकमत न्यूज नेटवर्क 
जव्हार :  ‘धूम्रपान करणे आरोग्यास हानीकारक आहे...’  असा इशारा अनेक सार्वजनिक ठिकाणी लिहिलेला पाहायला मिळतो, मात्र तरीही अनेक लोक बिनधास्तपणे धूम्रपान करताना आढळतात. त्यांना दंडाची अजिबात तमा नसते. तलफ आली की, अशी मंडळी हमखास खिशातून सिगरेट-बिडी काढतात आणि आपली तलफ भागवून घेताना दिसत आहेत.
धूम्रपान करीत असलेल्या व्यक्तीला जेवढा शारीरिक धोका आहे, तेवढाच धोका हा त्याच्या आजूबाजूला असलेल्या लहान बालके, वृद्ध आणि इतर नागरिकांना होत असतो. परंतु शहरात या सगळ्या गोष्टींचा विसर पडत सर्रास सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर धूम्रपान होत आहे. धूम्रपानाचा त्रास असताना सर्वसामान्य नागरिक मात्र गप्प आहेत.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई असताना हा नियम शहरात कोठेही पाळला जात नाही, शिवाय प्रशासनाकडून धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे, मात्र आरोग्य विभागाने याकडे डोळेझाक केली आहे.
बसस्थानक परिसरात आगारप्रमुख आणि शाळा परिसरात मुख्याध्यापक व महाविद्यालय परिसरात प्राचार्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु आजपर्यंत जव्हार येथील आगारप्रमुख यांच्याकडून दंड आकारणी करण्यात आलेली नाही. परिसरातील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बहुतांश नागरिक येत असतात. तेव्हाच काही जण धूम्रपानही करीत असतात. या वेळी त्यांच्या बाजूला उभे असलेल्यांना व बसलेल्यांना तोंडाला रुमाल बांधावा लागतो, 
असेही काही नागरिकांकडून सांगण्यात आले. 

दंडाच्या कारवाईसाठी 
पुरेसे मनुष्यबळ नाही 
बसस्थानकासह सार्वजनिक ठिकाणी अनेक जण धूम्रपान करीत असताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात नाही. शहरातील सार्वजनिक ठिकाणीही सर्रास धूम्रपान केले जाते. धूम्रपान करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी दंडाची रक्कम लिहिलेली असते, परंतु कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ पुरेसे नसल्याचेही काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

धुराच्या ॲलर्जीमुळे लागतो ठसका
धूम्रपान करीत असणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने गेल्यास धुराची ॲलर्जी असल्याने ठसका लागत असतो. यावर काहीतरी प्रतिबंध लागायला हवा, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान होण्यास आळा बसेल. शिवाय शिक्षेला घाबरून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान होणे बंद होऊ शकते, असे रहिवासी दीपाली नगरकर यांनी सांगितले. 

धूम्रपान करणाऱ्यांना केला जातो अटकाव 
एसटीमधून प्रवास करताना धूम्रपान करणाऱ्यांना अटकाव करण्यात येत आहे. एसटी आगार किंवा बस स्टँड परिसरात धूम्रपान करू नये यासाठी वारंवार लाऊड स्पीकरवरून आवाहन करण्यात येत असते, अशी माहिती जव्हार एसटी आगार व्यवस्थापक  सरिता बागल यांनी दिली.

Web Title: Bidi-cigarettes in public; No penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.