२५ हजार मतदारांपर्यंत जाण्याचे मोठे आव्हान

By admin | Published: May 12, 2017 01:37 AM2017-05-12T01:37:21+5:302017-05-12T01:37:21+5:30

भिवंडी-निजामपूर महापालिकेत चार वॉर्डांच्या प्रभागपद्धतीमुळे प्रचाराकरिता उपलब्ध केवळ १२ दिवसांत २५ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

A big challenge to go to 25 thousand voters | २५ हजार मतदारांपर्यंत जाण्याचे मोठे आव्हान

२५ हजार मतदारांपर्यंत जाण्याचे मोठे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे / भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेत चार वॉर्डांच्या प्रभागपद्धतीमुळे प्रचाराकरिता उपलब्ध केवळ १२ दिवसांत २५ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांपुढे आहे. मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्याकरिता प्रचारयात्रांवर भर देण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतला आहे.
भिवंडी महापालिकेत २३ प्रभागांतील ९० वॉर्डांकरिता निवडणूक होणार आहे. अनेक ठिकाणी मतदारयादीतील घोळाच्या तक्रारी, प्रभागांची वाढलेली भौगोलिक सीमा व मतदारांची वाढलेली सीमा आणि मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवण्याची भ्रांत यामुळे उमेदवार व त्यांचे कट्टर समर्थक यांना तारेवरील कसरत करावी लागणार आहे.
भिवंडीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस या पक्षांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचाराच्या अवघ्या १२ दिवसांत प्रचारफेऱ्या व चौकसभांवर प्रामुख्याने उमेदवारांचा भर असणार आहे. जास्तीतजास्त मतदारांपर्यंत किमान आपला चेहरा आणि चिन्ह पोहोेचवावे, यासाठी उमेदवारांनी व्यूहरचना आखल्याचे सांगण्यात येते.
भिवंडीतील ९० जागांपैकी ६५ जागा मुस्लिमबहुल परिसरातील आहेत, तर उर्वरित २५ जागा हिंदुबहुल परिसरातील आहेत. मुस्लिमबहुल परिसरात मुख्यत्वे काँग्रेस, राष्ट्रवादी-समाजवादी यांनी उमेदवार दिले आहेत. उर्वरित २५ वॉर्डात शिवसेना, भाजपा यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळेल. काही पक्षांना येथे उमेदवारच मिळालेले नाहीत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतकेच काय पण भाजपाही आपल्या पक्षातील मुस्लिम चेहरा असलेल्या नेत्यांना प्रचारात उतरवत आहे. अनेक उमेदवारांचाही तसाच आग्रह आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडूनही स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जात आहे, तर भाजपा राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीच्या बळावर मते मागणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या कामगिरीवर मते मागणार आहे. मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे लवकरच कळेल.

Web Title: A big challenge to go to 25 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.