‘बिग बीं’शी संबंधित वस्तू गोळा करणारा बिग फॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:25 AM2019-09-23T01:25:50+5:302019-09-23T01:26:04+5:30
कोणतंही मार्गदर्शन नसताना आज त्यांच्या संग्रही बिग बींशी निगडित ८६५० विविध गोष्टी आहेत.
- अभय फाटक
अमिताभ बच्चन... अर्थातच बिग बी हे नाव माहीत नसणारी व्यक्ती तशी दुर्मीळच असावी. यांचे करोडो चाहते. यांच्या चित्रपट, अभिनय, आवाजाने भारावून जात त्यांच्याशी निगडित विविध वस्तूंचा संग्रह करणे बिग बींचे बिग फॅन म्हणजे मोहन अय्यर. बिग बींवर आधारित वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या लेखांच्या कात्रणापासून छंद सुरू झाला होता. कोणतंही मार्गदर्शन नसताना आज त्यांच्या संग्रही बिग बींशी निगडित ८६५० विविध गोष्टी आहेत. आपल्या या छंदाची माहिती बिग बींना देण्याची सुवर्णसंधीही त्यांना मिळालेली आहे.
अमिताभ बच्चन हे एक असं नाव आहे की, ज्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. जनसामान्यांना अभिनयानेच नव्हे तर दैवी देणगी लाभलेल्या भारदस्त आवाजाने आणि खास शैलीने त्यांनी सर्वांना भुरळ पाडली आहे.
मोहन अय्यर हे अमिताभ बच्चन या व्यक्तिमत्त्वाने भारावलेले संग्राहक आहेत. त्यांचे चित्रपट बघत मोठे झालेले मोहन त्यांचे चाहते आहेत. गेली २० वर्षे ते अमिताभ बच्चन यांच्याशी निगडित असलेल्या गोष्टी छंद म्हणून जमवत आहेत. सुरुवात प्रकाशित झालेल्या लेखांची कात्रणं जमा करण्यापासून झाली. नंतर, लोकप्रिय मासिक, साप्ताहिक आणि वृत्तपत्रे यातील प्रेस रिपोर्ट्स, लेख आणि फोटो जमा करण्यास सुरुवात केली. कोणतंच मार्गदर्शन नसतानाही अमिताभ बच्चन यांच्याशी निगडित असलेल्या ८६५० वेगवेगळ्या गोष्टी यांच्या संग्रहात आहेत. यात अमिताभ बच्चन आणि मोहन यांच्यातील पत्रव्यवहाराचादेखील समावेश आहे.
मोहन आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची भेट घेण्यासाठी २००६ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात गेले होते. पण, असंख्य चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे, बंगल्यात प्रवेश मिळूनदेखील भेट घेता आली नाही. सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढले. पुन्हा २००७ मध्ये त्यांनी प्रतीक्षा बंगल्यात अमिताभ यांना भेटायचा प्रयत्न केला. काही सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीने आत प्रवेश मिळाला आणि चित्रीकरणादरम्यान जेवायला आलेल्या अमिताभ बच्चन यांची भेट आणि आशीर्वाद मिळाला. मोहन यांना त्यांच्या छंदाबद्दलची माहिती अमिताभ बच्चन यांना सांगता आली आणि त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देता आला. तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
मोहन यांना या अनोख्या छंदासाठी बरेच पुरस्कार मिळाले आहेत. लोकप्रिय आणि आघाडीच्या रेकॉर्डधारक संस्थांनी याची दखल घेतली आहे आणि मोहन यांचा सन्मान केला आहे. त्यांना प्रमाणपत्रे, पदके, ट्रॉफी इ.सह सुमारे २५ रेकॉर्डधारक संस्थांनी आजपर्यंत मान्यता दिली आहे. ‘मल्टिपल रेकॉर्ड होल्डर’ या शीर्षकाखाली मोहन यांना ‘इंडियाज राइजिंग स्टार २०१९’ तसेच ‘भारतीय आयकॉनिक पर्सनालिटी आॅफ इंडिया’ देऊन गौरविण्यात आले आहे. याखेरीज, मोहन यांच्याकडे सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांच्या गाण्यांचा मोठा संग्रह आहे. कॅसेट, ग्रॅमोफोन रेकॉर्ड, डीव्हीडी, सीडीस्वरूपात सुमारे १८७६ गाणी (२००० गाण्यांपैकी) यांच्या संग्रहात आहेत.
याचबरोबर मोहन आता दुसरा छंद म्हणून व्हिजिटिंग कार्ड एकत्रित करीत आहे आणि एक लाख कार्ड जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे १३ हजार कार्डे जमवली आहेत. ही सर्व विविध फोल्डर्समध्ये राज्य आणि विषयवार व्यवस्थित लावून ठेवली आहेत.
तरुण पिढीला मोहन यांचा एक संदेश आहे की, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काही छंद जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कठीण स्पर्धेमुळे सध्या तरुण पिढी तणावाखाली वावरताना दिसतेय. आपल्या नोकरी आणि व्यवसायाव्यतिरिक्त इतर सकारात्मक कामांमध्ये व्यस्त असणे आवश्यक आहे. निश्चितच छंद हा तरूण पिढीचेमनोबल वाढवण्यास मदत करून आपल्याला एखाद्या मानसिक तणावातून बाहेर पडायला मदत करतो.
(लेखक संग्राहक असून द हॉबी सर्कलचे संस्थापक आहेत.)