मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 06:14 AM2024-11-10T06:14:11+5:302024-11-10T06:14:46+5:30

रकमेबाबत संशय आल्याने पोलिस शिपाई मनोज भोये यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना हा प्रकार सांगितला. 

Big news Rs 3 crore 70 lakh seized on Wada Vikramgarh route | मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त

मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा : वाडा-विक्रमगड मार्गावरील पाली येथे शुक्रवारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने आलोंडेहून वाड्याकडे येणाऱ्या पिकअपची तपासणी केली असता, त्यात ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आढळली असून, ती जप्त करण्यात आली आहे. 

पांढऱ्या क्रमांकाची पिकअप अलोंड्यावरून वाड्याकडे येत होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. चालक महेंद्र सांडभोर (४५) व त्याच्यासोबत असलेले प्रतीक शिंदे, कल्पेश मिसाळ, सिक्युरिटी गार्ड रणजीत यादव यांच्याकडे गाडीतील रकमेबाबत विचारणा केली असता, हे वाहन सीएमएस कंपनी कार्यालय, ऐरोली, नवी मुंबई यांचे असून, त्यामधील रोख रक्कम ते एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. परंतु, गाडीच्या दर्शनी भागावर पुढील बाजूला चालकाचे नाव व कॅश वाहून नेण्याबाबतच्या तपशिलाची माहिती असणारा क्यूआर  कोड नव्हता.  तसेच गाडीतील व्यक्तींना गाडीमध्ये किती रक्कम आहे, याबाबत निश्चित आकडा सांगता येत नव्हता. त्यामुळे रकमेबाबत संशय आल्याने पोलिस शिपाई मनोज भोये यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना हा प्रकार सांगितला. 

वाडा पोलिस ठाण्यात केला पंचनामा
खात्री करण्यासाठी गाडी वाडा पोलिस ठाण्यात आणून दोन पंचांसमोर व सीएमएस कंपनीचे कर्मचारी प्रतीक शिंदे व कल्पेश मिसाळ यांच्यासमोर खात्री करून पंचनामा केला. त्यावेळी त्या गाडीतील पत्र्याच्या पेटीमध्ये ३ कोटी ७० लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. वाडा पोलिस ठाण्यात ती रक्कम ताब्यात घेतली असून, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी दिली. या कारवाईत स्थिर पथकाचे प्रभाकर सांबर, रवी पाटील, मनोज भोये आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Big news Rs 3 crore 70 lakh seized on Wada Vikramgarh route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.