काँग्रेसला मोठा धक्का
By admin | Published: February 24, 2017 07:43 AM2017-02-24T07:43:39+5:302017-02-24T07:43:39+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा यंदा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
पंकज रोडेकर / ठाणे
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा यंदा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ५२ जागांवर उमेदवार देऊनही काँग्रेसच्या चिन्हावर तिघे आणि एक पुरस्कृत असे चारच जण विजयी झाल्याने पक्ष एका हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढाच उरला आहे.
निर्णायकी अवस्थेत असलेल्या पक्षाला निवडणुकीपूर्वी गळती लागली होती. आघाडीला विरोध करून स्वत:चे अस्तित्व टिकवण्याची खुमखुमी काही नेत्यांत होती, पण पक्षाचे निवडणूक प्रभारी-माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वस्तुस्थितीची जाणीव करून देत आघाडीचा निर्णय घ्यायला लावला आणि त्यामुळे पक्षाची उरलीसुरली अब्रू वाचली.
काँग्रेसमधून सर्वाधिक वेळा निवडणूक लढणारे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे हे स्वत:च्या प्रभागापुरते उरले. ते असोत किंवा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शिल्पा सोनोने या दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून शिंदे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अर्थात, त्यांच्याकडे गमावण्याजोगे काही नव्हते. पण, एकेकाळी सत्तेच्या परिघात असलेल्या पक्षाने मात्र यानिमित्ताने बरेच काही गमावले.
ठामपाच्या २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ६२ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ उमेदवार निवडून आल्याने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. दरम्यानच्या काळात पक्ष निर्णायकी होत गेल्याने काही उमेदवारांनी पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा आसरा घेतला. ही गळती निवडणुकीच्या तोंडावरही कायम राहिली. त्यांना थांबवण्यात किंवा समर्थ पर्याय म्हणून उभे करण्यात पक्षाची नेतेमंडळी अपयशी ठरली. त्यानंतरही पक्षाने ५२ उमेदवार उभे केले. शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि त्यांचे बंधू, प्रदेश सचिव पूर्णेकर यांचे बंधू छत्रपती यांना त्यात संधी मिळाली. त्या सर्वांचा पराभव झाला.