ठाण्यात बॅडमिंटन शिबिरास मोठा प्रतिसाद
By admin | Published: April 18, 2016 01:11 AM2016-04-18T01:11:19+5:302016-04-18T01:11:19+5:30
सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारे ठाणे शहर आता क्रीडानगरी बनू पाहत आहे. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने
मुंबई : सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारे ठाणे शहर आता क्रीडानगरी बनू पाहत आहे. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या साथीने सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी बॅडमिंटनपटू मनोहर गोडसे व पॉवर लिफ्टर सतीश पाटाडे यांचा गौरव करण्यात आला.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात ठाणे शहराचे अपर पोलीस आयुक्त एस. पी. पाटणकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही यावेळी खेळाडूंशी संवाद साधला. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने राज्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रसाराच्या सन्मानार्थ बॅडमिंटनपटू मनोहर गोडसे, पॉवर लिफ्टर सतीश पाटाडे व भारत श्री गिरीश शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. ‘हल्लीची तरुणाई मैदानी खेळापेक्षा सोशल मीडियात जास्त रमते. त्यामुळे तरुणपिढी नैराश्येच्या जाळ््यात ओढली जाते. म्हणूनच तरुणांनी सोशल मीडियापेक्षा मैदानी खेळाकडे वळावे,’ असा सल्ला पाटणकर यांनी दिला.
१५० खेळाडूंचा सहभाग
महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान, गुजरात, बंगाल, तसेच सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथील १५० खेळाडंूनी या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. खेळाडूंसाठी दर्जेदार प्रशिक्षकांची फौज सज्ज असून, गुणवान खेळाडू घडवण्यासाठी अकादमी वचनबद्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले.