उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 09:29 AM2024-08-11T09:29:48+5:302024-08-11T09:32:13+5:30
Shiv Sena Vs Thackeray Group News: भविष्यात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे एकत्र येतील, असा दावा अनिता बिर्जे यांनी केला आहे.
Shiv Sena Vs Thackeray Group News: मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर विरोधक टीका करत असताना, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. यानंतर ठाण्यातील सभेला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदेंसह विरोधकांवर तोफ डागली. या घडामोडी घडत असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे. बिर्जेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या...
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पुन्हा सत्तास्थापना केली, तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता बिर्जे यांनी आनंदआश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत. हे पटल्यामुळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते मला पटले आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे अनिता बिर्जे यांनी सांगितले.
दरम्यान, मी आधीच सांगितलेले होते की, एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे एकत्र आले पाहिजे आणि भविष्यात ते घडणार आहे. तसेच माझा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. माझ्या या भावाचा उपयोग तळागाळातील सर्व महिलांना झाला पाहिजे, असे अनिता बिर्जे यांनी म्हटले आहे. या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने ठाकरे गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याचा दावा केला जात आहे.