बिहार राज्यपालांचा ठाण्यात सत्कार
By admin | Published: December 28, 2015 03:51 AM2015-12-28T03:51:14+5:302015-12-28T03:51:14+5:30
भाजपा सरकारने बिहारच्या राज्यपालपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसचे नेते कांती कोळी यांनी अखिल भारतीय कोळी समाजाच्या
ठाणे : भाजपा सरकारने बिहारच्या राज्यपालपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसचे नेते कांती कोळी यांनी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने त्यांचा ठाण्यात सत्कार आयोजित केला होता. कोविंद यांनी सत्कार स्वीकारल्याची गंधवार्ताही भाजपाच्या एकाही स्थानिक नेत्याला नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कोविंद हे स्वत: कोळी समाजाचे असून, त्यांची भाजपा सरकारने राज्यपालपदी नियुक्ती केल्याबद्दल कोळी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक हे माजी आमदार व काँग्रेसचे नेते कांती कोळी होते. परंतु भाजपाच्या एकाही नेत्याला राज्यपालांच्या दौऱ्याची गंधवार्ता नसल्याने, कोविंद हे आपल्या समाजाचा सत्कार स्वीकारून निघून गेले.
जुन्या आठवणींना उजाळा
साधारण ३० वर्षांपूर्वी कांती कोळी हे काँग्रेसमधून निवडून आलेले ठाण्याचे आमदार होते. आपण भाजपच्या तिकिटावर कानपूरमधून निवडून आलो होतो. कोळींचे संघटनात्मक कौशल्य पाहून त्या वेळी समाजाच्या महाराष्ट्र शाखेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. ती आजही त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडल्याचे कौतुकोद्गार
कोविंद यांनी सत्कार सोहळ्यात काढले. कोळी हे काँग्रेसमध्ये आणि आपण भाजपात असलो, तरी पक्षभेद बाजूला ठेवून दोघांनीही काम केल्याचे व यापुढेही काम करणार असल्याचे ते म्हणाले.