रस्त्यावरील खड्डयामुळे तरुणाच्या दुचाकीला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 06:47 PM2019-09-12T18:47:15+5:302019-09-12T18:47:32+5:30
रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. नागरीकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण - रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. नागरीकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काल सायंकाळी नेवाळी नाक्यावरील चौकात असलेल्या खड्डय़ामुळे एका दुचाकी चालकाचा अपघात झाला. त्याची दुचाकी खड्डय़ात आदळल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत. जखमी तरुणाचे नाव राजेंद्र मोरे असे आहे. तो कल्याण पूव्रेतील सह्याद्री लोकधारा इमारतीत राहतो.
या अपघात प्रकरणी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र खड्डय़ामुळे अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांची श्रृखंला सुरुच आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. खड्डे नागरीकांच्या जिवावर बेतत असून देखील प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याची कारवाई केली जात नाही. त्याकडे डोळेझाक केली जाते. राजेंद्र मोरे यांच्या दुचाकीला काल सायंकाळी अपघात होऊन त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. राजेंद्र हे कामोठे येथील एका पतपेढीत कामाला आहेत. काम आटोपून ते त्यांच्या दुचाकीवरुन घराकडे येत असताना ही घटना घडली. राजेंद्र यांच्या दुचाकीवर त्यांच्यासोबत त्यांचे मित्र गणोश हे देखील होते. त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. नेवाळी नाक्यावरील खड्डे भरले जात नसल्याने नेवाळी नाक्यावरील वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन खड्डे भरण्याचे काम केले होते. हे काम चार दिवसापूर्वीच करण्यात आले होते. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेऊन त्याठिकाणचे खड्डे बुजविले होते. अंबरनाथ शीळ मार्गावर नेवाळी नाका आहे. हा रस्ता एमआयडीसीच्या ताब्यात आहेत. तसेच नेवाळी ते चक्की नाका हा रस्ता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. मोरे यांचा अपघात खड्डय़ामुळे झाला आहे. त्यांच्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आत्ता उपस्थित केला जात आहे. दोनच दिवसापूर्वी डोंबिवलीतील महिला प्रज्ञा रोङोकर यांच्या पायाला रस्त्यावरील खड्डय़ामुळे दुखापत झाली होती. ही घटना ताजी असताना राजेंद्र मोरे यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले आहे.