कळवा-मुंब्य्रात धावणार बाइक अॅम्ब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:40+5:302021-03-13T05:14:40+5:30
ठाणे : सध्या ठाणे शहरात वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास तेथे रुग्णवाहिका पोहचण्यासाठी ...
ठाणे : सध्या ठाणे शहरात वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास तेथे रुग्णवाहिका पोहचण्यासाठी वेळ जातो. त्यावर तोडगा म्हणून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी बाइक द्याव्यात, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार बाइक अॅम्ब्युलन्स दिल्या आहेत.
शुक्रवारी कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या दुचाकी रुग्णवाहिका सामाजिक कार्यकर्त्या ॠता जितेंद्र आव्हाड यांच्याकडे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सुपूर्द केल्या. यावेळी कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, माजी विरोधी पक्षनेता मिलिंद पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, नगरसेवक प्रकाश बर्डे आदी उपस्थित होते.
अशी असणार बाइक अॅम्बुलन्स
यात दुचाकीला साइड कार जोडण्यात आली आहे. या कारमध्ये स्ट्रेचर बसविले असून, त्यावर एक रुग्ण आरामात झोपू शकतो. तर, या साइडकारवर छतही टाकले आहे. त्यामुळे रुग्णाला सावलीदेखील मिळणार आहे. या बाइक अॅम्बुलन्सचे स्ट्रेचर काढून रुग्णाला रुग्णालयात नेणे शक्य होणार आहे. शिवाय त्यावर चालकासह अन्य एकजण बसू शकणार आहे.