भिवंडीत दुचाकीला टँकरची जोरदार धडक; अपघातात चार जण जखमी
By नितीन पंडित | Published: September 1, 2022 09:14 PM2022-09-01T21:14:10+5:302022-09-01T21:14:48+5:30
भिवंडीत डाईंग साइजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात असून या कंपन्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो.
भिवंडी:डाईंग कंपन्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरने एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीसह त्यांची दोन लहान मुले असे चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडीतील मीठ पाडा खोणी रस्त्यावर गुरुवारी दुपारी घडली आहे.
भिवंडीतील मिठापाडा येथे रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक देताच दुचाकीवरील परिवार खाली कोसळला.या दुचाकीवर पती पत्नी व त्यांची दोन मुले ज्यात एक मुल पाच वर्षाचा तर दुसरा अंदाजे दीड वर्षाचे अशी दोन मुले असे चार जण रस्त्याच्या कडेला थांबले होते.याच दरम्यान टँकरने धडक दिल्याने चारही जण जखमी झाले असून या जखमी परिवाराला स्थानिक नागरिकांनी रिक्षातून एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र यातील लहान मुलास गंभीर दुखापत झाली असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे.
दुचाकीवरील परिवार टिटवाळा येथील असून वसई येथे मोठ्या भावाकडे दुचाकीस्वार आपल्या परिवारासह जात असतांना मिठपाडा येथे हा अपघात झाला असून अपघातग्रस्त दुचाकी व टँकर पोलसांनी जप्त केले असून टँकर चालक फरार झाला आहे.याप्रकरणी टँकर चालका विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती निजामपुरा पोलिसांनी दिली आहे.मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या चारही जखमींची नावे पोलिसांकडून मिळाली नाही.
भिवंडीत डाईंग साइजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात असून या कंपन्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र हे टँकर अवैध व मुद्तबाह्य असून या भंगार अवस्थेतील पाण्याच्या टँकरमुळे अनेक अपघात होत असतात मात्र वाहतूक पोलीस यंत्रणा या मुद्तबाह्य टँकरवर कोणतीही कारवाई करत नसल्याने या टँकर चालकांची मुजोरी भिवंडीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.