रेसिंगच्या नादात दुचाकीस्वाराने गमावला जीव; अंबरनाथच्या लोकनगरी बायपासवर अपघात
By पंकज पाटील | Published: February 10, 2024 08:17 PM2024-02-10T20:17:29+5:302024-02-10T20:17:43+5:30
अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
अंबरनाथ : अंबरनाथचा लोकनगरीत बायपास हा सध्या वाहन चालकांना स्टंट करणारा रस्ता वाटू लागला आहे. असाच एक बाईक स्वार आपल्या मित्रांसह भरधाव वेगात रेसिंग करत असताना त्याची बाईक थेट डिव्हायडरला धडकल्याने मोठा अपघात घडला आणि त्यात त्या बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला.
अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. विशाल वर्मा आणि त्याचा मित्र ताहा शेख हे त्यांच्या दुचाकीवरून भरधाव वेगात आपल्या मित्रांच्या दुचाकी सोबत रेसिंग करत होते. लोकनगरी बायपास रस्ता हा मोकळा असल्यामुळे त्यांच्या गाड्यांचा वेग अति होता. मात्र त्यावेळेस विशाल वर्मा याचा दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने तो शेजारी असलेल्या डिव्हायडरला धडकले त्यात विशाल वर्मा याचा जागीच मृत्यू झाला. तर शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या वर्षभरात या लोकनगरी बायपासवर अनेक अपघात घडले असून रस्ता मोकळा मिळत असल्यामुळे अनेक वाहन चालक या ठिकाणी अति वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे या वेगवान वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे. महिन्याभरापूर्वी या ठिकाणी एका चार चाकी कारला देखील असाच अपघात घडला होता. वाढत्या अपघातांच्या घटनेमुळे लोकनगरी बायपास हा मृत्यूचा बायपास होत आहे की काय अशी चर्चा शहरात निर्माण झाली आहे.