ठाण्यात १५ हजार प्रवाशांनी खरेदीनंतर घेतले बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:35 AM2019-07-20T00:35:46+5:302019-07-20T00:35:55+5:30
नो बिल नो पेमेंट या नावाने बिल दिले नाही तर पदार्थ खाऊनही पैसे देऊ नका, असे रेल्वेने जाहिर केले आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : नो बिल नो पेमेंट या नावाने बिल दिले नाही तर पदार्थ खाऊनही पैसे देऊ नका, असे रेल्वेने जाहिर केले आहे. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उपाहारागृहात प्रथमदर्शी दिसणारी बिल मशीन दिसून लागली असली तरी येथील १६ उपाहारागृहातून १२ हजार ते १५ हजार प्रवाशांनी खरेदी केलेल्या वस्तूचे बिल घेतले आहेत. दररोज सरासरी साधारणत:१० टक्के प्रवासी बिलाची मागणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. त्यामध्ये दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अप-डाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस ये-जा करतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० ते ४ लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये-जा करतात. स्थानकातील १० फलाटांवर एकूण १६ उपाहारगृहे आहेत. त्यातच रेल्वेने गेल्या काही दिवसांपूर्वी जाहिरात करून नो बिल नो पेमेंट असे म्हटले. त्यानंतर ठाणे रेल्वे प्रशासनाने स्थानकातील उपाहारागृहचालकांना बिल देण्याचे आवाहन केले. त्यानुसार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ठाण्यातील रेल्वे स्थानकांवरील उपाहारागृहात बिल देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या आठ दिवसात जवळपास १२ ते १५ हजार प्रवाशांनी खरेदी केलेल्या वस्तूचे बिल घेतले आहे.
>उपाहारगृहचालक प्रवाशांकडून अधिक पैसे उकळू नयेत, यासाठी नो बिल नो पेमेंट ही संकल्पना रेल्वेने सुरू केली आहे. प्रवासी घाईगडबडीत असल्याने त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी बिल घेतल्याशिवाय पदार्थ खाऊनही पैसे देऊ नका,असे आवाहन केले आहे.
- आर.के. मीना, प्रबंधक, रेल्वे स्थानक, ठाणे.
>कळवा-दिव्यात उपाहारगृह नाही
ठाण्यात जरी १६ उपाहारागृह असतील तरी मुंब्य्रातील एक उपहारागृह सोडले तर कळवा आणि जंक्शन म्हणून ओळख असलेल्या दिवा रेल्वे स्थानकात एकही उपहारागृह नाही.
>दक्षिणेतील गाड्यांमध्ये प्रवाशांची लूट
ठाणे रेल्वे स्थानकातून दक्षिणेत जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये फेरीवाल्यांमार्फत विकल्या जाणाºया पदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नाही. त्यातच या गाड्यांमध्ये बिल दिले जात नसल्याने प्रवाशांची लुट केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घ्यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
> बिल दिले जाते. पण, ते घेण्यासाठी घाईगडबडीत वेळ नसतो. रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेत आता बिल घेतल्याशिवाय पेमेंट करणार नाही.
- राजेश चव्हाण, प्रवासी.
> मशीन आदीपासून उपाहारागृहात आहेत. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार बिल दिले जात होते. आता रेल्वेच्या जाहिरातीनुसार गेल्या काही दिवसांत दररोज अवघ्या १० टक्के प्रवाशांकडून बिलची मागणी केली आहे.
- उपाहारागृहचालक